आधी म्हणाले ‘हत्या’ मग सदोष मनुष्यवध! पोलीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताहेत, सरकारी वकिलांची न्यायालयात अलटी-पलटी

आधी म्हणाले ‘हत्या’ मग सदोष मनुष्यवध! पोलीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताहेत, सरकारी वकिलांची न्यायालयात अलटी-पलटी

वरळीतील हिट अॅण्ड रनच्या भयंकर गुह्याचा पोलीस तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मिहीर शहाला बुधवारी शिवडी न्यायालयात हजर केले, त्यावेळी पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेचे पितळ उघडे पडले. मिहीरने अत्यंत निर्घृणपणे कावेरी नाखवा यांची हत्या केली, असा दावा सरकारी वकिलांनी आधी केला. मात्र काही मिनिटांतच स्वतःच्या जबाबात पलटी खाल्ली आणि हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा असल्याचे विधान केले. यावेळी पोलिसांनी मिहीरची कोठडी मागताना पानांची नुसतीच चाळाचाळ केली. त्यामुळे पोलीस या गंभीर प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताहेत, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

मिंधे गटाचा पालघर येथील उपनेता राजेश शहाचा मुलगा मिहीर शहाने रविवारी पहाटे दारूच्या नशेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवली आणि मच्छी विक्रेत्या कावेरी नाखवा यांचा अत्यंत निर्दयीपणे बळी घेतला. तब्बल 60 तास मोकाट राहिलेल्या मिहीरला अखेर मंगळवारी अटक करण्यात आली. त्याला बुधवारी शिवडीतील महानगर दंडाधिकारी सुहास भोसले यांच्यापुढे हजर करण्यात आले. यावेळी मिहीरची कोठडी मागताना पोलीस आणि सरकारी वकिलांनी केलेल्या दाव्यातील विसंगती समोर आली. घटनेच्या सुरुवातीपासून मिहीरला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची जोरदार टीका होत आहे. अपघात झाल्याचा दिखावा केला जात असला तरी प्रत्यक्षात हा खून असल्याचा आरोप होत आहे. खून केल्याचा तसेच पुरावे नष्ट करण्याच्या षड्यंत्राचा दाट संशय असतानाच बुधवारी सुनावणीच्या सुरुवातीला सरकारी वकिलांनी खुनाचा गुन्हा मान्य केला. नंतर काही मिनिटांत त्यांनी आपल्या जबाबात पलटी खाल्ली आणि हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा असल्याचा दावा केला. जबाबातील अलटीपलटीचा हा  प्रकार घडला त्यावेळी न्यायालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची फौज उभी होती. पोलीस या गुह्याच्या तपासातील काही गोष्टींबाबत गुप्तता बाळगत आहेत. माहितीबाबत स्पष्टता नसल्याने पोलीस सत्य गोष्टी झाकून नेमके कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोर्टाने कागदपत्रे मागितली; पोलिसांची नुसतीच चाळाचाळ 

न्यायालयाने दुसरा आरोपी राजऋषी बिडावतच्या रिमांड कॉपीची कागदपत्रे पोलिसांकडे मागितली. त्यावेळीही पोलिसांनी या गंभीर गुह्याच्या तपासात ठेवलेला वेंधळा आणि संवेदनाशून्य कारभार दिसून आला. जवळपास दहा मिनिटे पोलिसांनी फाईल व इतर कागदपत्रांची चाळाचाळ केली. एवढय़ा गंभीर गुह्यात पोलीस तपासातील कागदपत्रांच्या सुसूत्रतेबाबत खबरदारी का घेत नाहीत? अशीही चर्चा न्यायालयाच्या आवारात सुरू होती.

16 जुलैपर्यंत कोठडी

60 तास मोकाट राहिल्यानंतर अटक केलेल्या क्रूरकर्मा मिहीरला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मिहीरच्या वकिलांनी आक्षेप घेतला. पोलिसांच्या तपासातच विसंगती आहेत, असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र गुह्याचे गंभीर स्वरूप विचारात घेऊन न्यायालयाने मिहीरला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली.

केस-दाढी कापली!

मिहीरने फरार झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा, स्वतःची ओळख लपविण्यासाठी अनेक उपद्व्याप केल्याचे उघडकीस आले आहे. स्वतःचा दाढीवाला चेहरा कुणाला ओळखता येऊ नये म्हणून त्याने अपघातानंतर कारमध्येच केसाचा खास कट आणि दाढी कापली.

मद्यपानाच्या आरोपाबाबत कुठलीच वाच्यता नाही

जुहू येथील बारमध्ये दारूची पार्टी करून मिहीर दक्षिण मुंबईत लाँग ड्राइव्हला आला होता. मद्यप्राशन करून काही तासांतच त्याने बीएमडब्ल्यू कार बेदरकारपणे चालवून निष्पाप कावेरी नाखवा यांचा बळी घेतला. नंतर कावेरी यांना ‘सी लिंक’पर्यंत फरफटत नेले. मिहीरने दारूच्या नशेत हा सर्व अतिरेक केल्याचे उघडउघड स्पष्ट होत असतानाही पोलिसांनी बुधवारी न्यायालयात मद्यपानाच्या आरोपाबाबत कुठलीही वाच्यता केली नाही.

आरोपीचे वडील मुख्यमंत्र्यांचे खास आहेत म्हणून फडणवीस गप्प आहेत का? प्रदीप नाखवा यांचा संतप्त सवाल

‘माझी मुलगी तिच्या आईसाठी टाहो फोडते आहे, तिला तिची आई हवीय. मी कुठून आणून देऊ तिला आई?, असा आर्त सवाल प्रदीप नाखवा यांनी केला.

नेमकं काय घडतंय?

शनिवारी रात्री मिहीरच्या मित्राने विस ग्लोबल तपस बारमध्ये बुकिंग केले होते. तर बारमधील बिल मिहीरच्या मित्राने नाही तर मिहीरनेच त्याच्या कार्डने पेड केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मिहीरच्या तीन मित्रांचा जबाब नोंदवला आहे.

गोरेगाव येथून निघाल्यावर मिहीर, त्याची आई व बहिणी ठाण्यात गेल्या. येऊर येथे ते एक दिवस लपून राहिले. तेथून मग दुसऱ्या दिवशी ते सर्व शहापूरला पळाले. शहापूरला शहा यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या रिसॉर्टमध्ये ते थांबले होते, अशी माहिती समोर आली आहे.

वरळी अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज अद्याप समोर आलेले नाही. या फुटेजमधून आरोपी मिहीरचा पर्दाफाश होणार आहे. त्यामुळे हे फुटेज का लपवले जात आहे, असा सवाल विचारला जात आहे.

मिहीर हा सहआरोपींच्या मदतीने घटनास्थळावरून पळून गेला. त्याने गुन्हा केल्यानंतर कारच्या नंबर प्लेटची विल्हेवाट कुठे लावली? फरार होऊन कोणाकोणाला संपर्क केला? पुरावे कशाप्रकारे नष्ट केले? त्याला फरार होण्यासाठी सहआरोपीशिवाय आणखी कोणी मदत केली? याचा तपास करायचा आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

पोलीस या प्रकरणावर बोलायला तयार नाहीत. प्रकरण वरच्या लेवलचे आहे. वरिष्ठ पातळीवर तपास सुरू आहे. आम्ही काही बोलू शकत नाही, असे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

जुहूतील ग्लोबल तपस बारवर बुलडोझर

बेदरकारपणे गाडी चालवून वरळीत कावेरी नाखवा यांचा बळी घेणाऱ्या मिहीर शहाने पार्टी केलेल्या जुहूतील बेकायदा व्हाइस ग्लोबल तपस बारवर पालिकेने आज बुलडोझर चालवला. या कारवाईत बेकायदा बांधकाम पालिकेने हटवले.

हिट अॅण्ड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याने याच बारमध्ये मित्रांसोबत पार्टी केली होती. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आणि 18 हजार रुपयांचे बिल पोलिसांच्या हाती लागले आहे. यानंतर पोलीस, पालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या बारवर कारवाई करण्यात आली. यामध्ये घटनेच्या दुसऱ्याच दिवशी हा बार ‘सील’ करण्यात आला होता.

जुहू येथील अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम पालिकेच्या के/पश्चिम अंधेरी विभागाकडून तीव्र करण्यात आली आहे. यामध्ये जुहू चर्च मार्गावरील ‘व्हाईस ग्लोबल तपस बार’ने केलेल्या सुमारे 3 हजार 500 चौरस फुटांच्या वाढीव, अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्वयंपाकघर, तळमजला आणि बंदिस्त छतावरील वाढीव, अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकण्यात आला. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहआयुक्त विश्वास शंकरवार आणि सहाय्यक आयुक्त (के पश्चिम) चक्रपणी अल्ले यांच्या नियंत्रणाखाली अनधिपृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;