फरार मिहीर शहाला अटक; रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत म्हणून सेटिंग…

फरार मिहीर शहाला अटक; रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत म्हणून सेटिंग…

वरळीमध्ये भल्या पहाटे बेदरकारपणे गाडी चालवून कावेरी नाखवा यांचा निर्दयीपणे जीव घेणारा मिंधे गटाचा उपनेता राजेश शहा याचा मुलगा फरार मिहीर याला पोलिसांनी तब्बल 60 तासांनी विरार येथून आज अटक केली आहे. या घटनेत आरोपीला मदत केल्याप्रकरणी मिहीरची आई, दोन बहिणी आणि अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र मुख्य आरोपी मिहीर याला अटक करण्यास तब्बल 60 तास घालवल्यामुळे ‘रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत म्हणून पोलिसांनी सेटिंग केले का, असा सवाल निर्माण झाला आहे. शिवाय अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी 1 जुलैपासून लागू झालेल्या नव्या कायद्यानुसार गाडीने फरफटत नेण्याच्या गुन्ह्याला कोणती शिक्षा करावी याबाबत स्पष्टता नसल्याने खुनी मिहीरला कठोर शिक्षा कशी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

मिहीर शहा (23) याने रविवारी पहाटे वरळीच्या सीजे हाऊसजवळ दारूच्या नशेत तर्रर्र असताना भरधाव बीएमडब्ल्यू कार चालवून प्रदीप आणि कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीवरील प्रदीप व कावेरी नाखवा हे पती पत्नी त्या कारच्या बोनेटवर पडले. त्याही अवस्थेत गाडी थांबवा म्हणून नाखवा दाम्पत्य विनंती करत होते. पण दारूच्या नशेत बेधुंद झालेला चालक मिहीर शहा याने माणुसकी न दाखवता कार थांबवण्या ऐवजी ती चालूच ठेवली. दुर्दैवाने कावेरी या चाक आणि बंपरमध्ये अडकल्या. तरीही निर्दयी मिहीरने त्यांना दीड किमी अक्षरश: फरफटत नेले. पुढे जाऊन त्याने कार थांबवली आणि आपल्या जागा बदलल्या. मिहीर शेजारच्या तर मुळ चालक बिडावतला स्टेअरिंगवर बसवले. तिथेही त्यांनी कळस केला. कावेरी यांना बंपर मधून काढून रस्त्यात तसेच ठेवले. मग गाडी मागे घेऊन पुन्हा कावेरी यांच्या अंगावर चढवून आरोपींनी पळ काढला. आरोपी नशेत होते, घटना पहाटेला घडली. पण तरीही पोलिसांना मिहीर मिळाला नाही. मुंबईत जागोजागी सीसीटीव्ही असताना पोलिसांना मिहीर तीन दिवस मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात आहे.

मोबाईल सुरू केला आणि सापडला…
अपघात केल्यानंतर मिहीर ने गोरेगाव येथील प्रेयसीचे घर गाठले. थोडय़ावेळाने तेथे मिहीरची आई, दोन बहिणी व मित्र आला. तेथून सर्वजण शहापुर येथे जाऊन लपले. सर्वांनी त्यांचे मोबाईल बंद करून ठेवले होते. काल पालघर येथील मित्र मिहिरला भेटायला शहापुरला गेला होता. तेथून दोघे विरारला गेले. मित्राने विरार येथे गेल्यावर काही मिनिटासाठी मोबाईल चालू केला आणि ते आमच्या पथ्यावर पडले असे पोलिस सांगतात. मित्रांच्या मोबाईलचे लोकेशन मिळाल्यानंतर वरळी पोलिसांनी त्याला आज सकाळी विरार फाटा येथे पकडले.

बिडावतला पोलीस कोठडी
अपघाताच्या वेळी मिहीर सोबत कारमध्ये असलेला मुळ चालक राजऋषी बिडावत याला आज वरळी पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. न्यायलयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर बिडावत याला 11 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अटकेसाठी तीन दिवस का लागले? – वर्षा गायकवाड
राजेश शहा यांच्या मुलाला अटक करण्यास तीन दिवस का लागले? मुंबई पोलिसांची तुलना जगप्रसिद्ध स्कॉटलंड यार्डशी केली जाते अशा मुंबई पोलीस दलाला आरोपी तीन दिवस सापडत नाही यावर विश्वास बसणे कठीण आहे. आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का, असा सवाल विचारून आता तो दारू प्यायला होता हे निष्पन्न होणारच नाही. त्यासाठीच तीन दिवसांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुख्य आरोपीवर 103 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

नव्या कायद्यात गुन्हेगाराला पळवाट
‘हिट अँड रन’ यासारख्या गुन्ह्यांसाठी 1 जुलैपासून लागू झालेल्या कायद्यानंतर वरळीतील या पहिल्याच प्रकणात खटला चालवला जाणार आहे. या नव्या कायद्यानुसार मुख्य आरोपीचे वडील राजेश शाह यांच्यावर भारतीय न्याय संहितेमधील कलम 105 (सदोष मनुष्यवध), 238 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, शहा यांच्यावर कलम 105 का लावलं? यावर तपासअधिकारी आणि पोलीस अधिकारी निरुत्तर झाले. यावर न्यायाधीश भोसले यांनी स्वतŠ पोलिसांना ‘बीएनएस’चं पुस्तक देत कलम लावण्याआधी पोलिसांनी थोडा ’होमवर्प’ करावा अशी, समज दिली. तर रस्ता सुरक्षेबाबत भारतीय न्यायिक संहितेच्या नव्या कायद्यात असं म्हटलं आहे की, एखाद्या वाहनामुळे अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर लगेचच, वाहन चालकानं अपघाताची माहिती पोलिसांना किंवा प्रशासनाला दिली, तर त्याच्यावर मोठी कारवाई केली जाणार नाही. मात्र अपघातानंतर चालक कोणालाही काहीही न सांगता फरार झाला तर त्याला किमान 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेचं प्रावधान आहे. पण नव्या कायद्यानुसार एखाद्याने गाडी चालवताना त्याच्या कारच्या बोनेटवर कित्येक किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं तर त्याला काय शिक्षा दिली जाईल? याबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण नसल्याने गुन्हेगाराला शिक्षा कशी होणार असा सवाल निर्माण झाला आहे.

आई आणि दोन बहिणींसह पाच जण ताब्यात
शहापूर परिसरातील डोलखांब बंजारा हिल परिसरातून मुंबई क्राईम ब्रँच युनिटने 5 जणांना ताब्यात घेतलं. यामध्ये मिहीर शहा याची आई आणि दोन बहिणींचा समावेश आहे. तसेच मिहीरचा एक मित्र आणि रिसॉर्टच्या मालकाचादेखील समावेश आहे. मिहीरची आई मिनी राजेश शहा (वय 50), मिहीरची मोठी बहीण पूजा (वय 32), दुसरी बहीण किंजल (वय 27) यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच अवादित सिंग तेजसिंग (वय 23), हसन अब्दुल वहीत खान (वय 19) या दोघांनाही डोलखांब बंजारा हिल परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई क्राईम ब्रँच युनिटने या पाचही जणांची नोंद किनवली पोलीस स्थानकात देत मुंबई आणले आहे. अजून त्यांना अटक केलेली नाही.

रक्तात दारूचा अंश कसा मिळणार
अपघात होऊन तीन दिवस उलटले त्यामुळे आता दारू पिऊन अपघात करणाऱ्या मिहीरच्या रक्तात दारूचा अंश सापडणार कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिहीर हा सराईत गुन्हेगार नाही. सराईत गुन्हेगारांना लिलया पकडणाऱ्या मुंबई पोलिसांना मिहीरला पकडायला दोन दिवस का लागले. यात काही राजकीय दबाव होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्या बारवर एक्साईज विभागाची कारवाई
वरळी येथील हिट अँड रन प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज)ने जुहू येथील वीस ग्लोबल तपास बारवर कारवाई केली आहे. एक्साईज विभागाने बारच्या मालकाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तसेच सुनावणी होईपर्यंत बारमध्ये दारूविक्री आणि खरेदीचे व्यवहार करू नये अशा सूचनादेखील दिल्या आहेत. आज सकाळी पोलिसांचे पथक त्या बारमध्ये गेले होते. पोलिसांनी त्या बारची तपासणी केली.

रविवारी पहाटे वरळी सी जे हाऊस परिसरात येथे भरधाव वेगातील कारने प्रदीप आणि कावेरी नाखवाच्या मोटारसायकलला धडक दिली होती. त्या धडकेत कावेरी नाखवाचा मृत्यू झाला होता, तर प्रदीप नाखवा हे जखमी झाले होते. ती कार शिंदे गटाच्या पालघर उपनेता राजेश शहा याचा मुलगा मिहीर शहा चालवत असल्याचे समोर आले.

अपघातानंतर मिहीर हा पळून गेला होता. या घटनेची गंभीर दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतली. शनिवारी रात्री मिहीर आणि त्याच्या चार मित्रांनी जुहू येथील वीस ग्लोबल तपास बारमध्ये दारू प्यायली होती. दारूचे 18 हजार रुपयांचे बिल मिहीरच्या मित्राने भरले होते. मिहीरने दारूचे बिल त्याच्या सोशल मीडियावरदेखील अपलोड केले होते. याप्रकरणी वरळी पोलिसांनी वीस ग्लोबल बारमध्ये जाऊन तपासणी केली. बारमधील डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या रात्री मिहीर हा बारमधून जात असल्याचे फुटेजमध्ये उघड झाले होते. तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱयाने दुपारी बारची तपासणी केली. नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारमालकाला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. त्या नोटिशीवर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होईल. सुनावणी झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत बारमालकाला बारमध्ये दारू खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;