…तर मुंबईची तुंबई झालीच नसती, स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्र्यांनी पावसावर फोडू नये! नाना पटोले बरसले

…तर मुंबईची तुंबई झालीच नसती, स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्र्यांनी पावसावर फोडू नये! नाना पटोले बरसले

मुंबई व उपनगरातील परिस्थिती पहिल्याच पावसाने अत्यंत भयावह झाली आहे. मुंबई व उपनगरातील अनेक भाग पाण्याने तुडुंब भरले, रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प होऊन मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. महानगरपालिका व रेल्वे प्रशासन यांच्यात कसलाही समन्वय नाही तर दुसरीकडे भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांना शिंदे सरकारच्या पापाची फळे भोगावी लागत आहे. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाते हे अत्यंत गंभीर आहे. पावसाने शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचे पितळ उघडे पाडले असून महाभ्रष्टयुती सरकारने, चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

महायुती सरकारच्या कारभाराची पोलखोल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेचे कारभारी स्वतः मुख्यमंत्री आहेत पण चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सुत्रे असल्याने मुंबई व महाराष्ट्राला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. महापालिकेच्या कार्यालयात दोन पालकमंत्र्यांची कार्यालये मुंबईकरांच्या कष्टाचे पैसे खाण्यासाठी काढली आहेत का? असा संतप्त सवाल विचारून स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्री पावसावर फोडत आहेत. मुंबईत झालेला पाऊस हा काही पहिल्यांदाच झालेला नाही. यापेक्षा मोठा पाऊस मुंबईत झालेला आहे पण आजच्या सारखी बिकट परिस्थिती झाली नव्हती. राजकारणापेक्षा मुंबईच्या कामात जास्त लक्ष घातले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. मुंबईत कोट्यवधी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधले पण त्यात खड्डे आहेत. कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागली, अटल सेतूला भेग्या पडल्या, हा महायुतीचा विकास आहे का? महापालिकेने मान्सूनपूर्व कामे केली, नालेसफाई केली असा सरकारचा दावा आहे तो या पावसाने खोटा ठरवला. मुख्यमंत्री ग्रीन कार्पेटवर उभा राहून नालेसफाईच्या पाहणीचे बिभत्स प्रदर्शन करत होते. त्यांच्या इव्हेंटबाजीचा पर्दाफाश झाला आहे. नालेसफाईत सुद्धा हातसफाई करुन खिसे भरण्याचेच काम झाले म्हणून मुंबई तुंबली. एकाच पावसात विधिमंडळाचे अधिवेशन दिवसभरासाठी तहकूब करावे लागले हे या सरकारचा गलथानपणा व निष्काळजीपणाचे उदाहरण आहे, अशा शब्दात त्यांनी मिंधे सरकारला सुनावलं.

मुंबईत पावसाने जनजीवन ठप्प केले असताना राज्याच्या अनेक भागात मात्र अद्याप हजेरी लावलेली नाही. अनेक भागात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर ओढवले आहे. पाणीटंचाईची अवस्था अत्यंत भयंकर आहे. अनेक गावांत पाण्यासाठी माता भगिणींना पाच पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. टँकरमाफिया आणि सरकारी अधिकारी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सरकार फक्त मंत्रालयातून आदेश देते पण प्रशासन खाली काहीच काम करत नाही, याकडे राज्य सरकार कधी लक्ष देणार? असा सवाल देखील नाना पटोले यांनी विचारला.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. पोलिसांचा धाकच नसल्याने गुन्हेगार मोकाट आहेत. पुण्यातील पोर्शे अपघातातून सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. वरळीत एका महिलेला भरधाव गाडीने चिरडले. ही कार शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची आहे. दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवल्याने एका निरपराध महिलेचा मृत्यू झाला. शिंदे फडणवीस सरकारला सत्तेचा माज आला आहे, मुख्यमंत्री म्हणतात कोणालाही पाठीशी घालणार नाही पण त्यांना कशाचेही गांभीर्य नाही. महाराष्ट्र सुरक्षित राहिला नाही हा संदेश देशात जात असून ते राज्याच्या हिताचे नाही. राज्यात अधिकारीही सुरक्षित राहिले नाहीत. पुण्यात वाहतूक शाखेच्या महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार घडला, महाराष्ट्र गुंडाराज व माफिया राज करून ठेवले आहे. सरकारचा प्रशासनातील हस्तक्षेप, पैसे घेऊन बदल्या करणे अशा प्रकारांमुळे प्रशासन काम करत नाही त्याचे परिणाम जनेतेला भोगावे लागत आहेत. सरकारला जाग आली नसेल तर जनताच आता त्यांना घरी पाठवेल, असेही नाना पटोले म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;