अन् हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला; ‘हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरचा व्हिडीओ

अन् हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला; ‘हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरचा व्हिडीओ

विश्वचषक जिंकून आलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी संपूर्ण मुंबई सज्ज झाली होती. टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने मरिन ड्राइव्ह परिसरात आले होते. नरिमन पॉइंट ते मरिन ड्राइव्हपर्यंत भारतीय संघाची बसमधून मिरवणूक काढण्यात आली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र या व्हिडीओतील कॅप्शनमुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. ‘..आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला’, असं प्रसादने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये टीम इंडिया बसमधून जाताना दिसत आहे. आता ट्रोलिंगनंतर प्रसादने उत्तरसुद्धा दिलं आहे.

प्रसाद खांडेकरची पोस्ट-

‘…आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला. आज साऊथ मुंबईला कामानिमित्त जायचंच होतं. विचार केला की नरिमन पॉईंटला जाऊन चॅम्पियन्सच्या विजयी मिरवणुकीत पण सहभागी होऊया. पण न्यूजमध्ये गर्दीचे फोटो पाहिले आणि जायचा मोह टाळला. गप्पपणे बोरिवलीला निघालो. साधारण सांताक्रूझच्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमत असलेली दिसली आणि पटकन ट्यूब पेटली की अरे आपले चॅम्पियन्स इथूनच जाणार आहेत. नंतर थोड्या वेळात आजूबाजूला पाहिलं तर संपूर्ण हायवेवर गाड्या रस्त्यात मध्येच आडव्या टाकून सगळेच टीम इंडियाची वाट बघत होते. क्षणाचाही विलंब न करता गाडीतून उतरलो आणि दुसऱ्या क्षणाला जगजेत्ते गाडीतून समोर आले. अगदी आतून मनातल्या मनात त्यांना एक सॅल्युट ठोकला. कदाचित तो मनातल्या मनात अगदी मनापासून ठोकलेला सॅल्युट टेलिपथीने हार्दिक पांड्यापर्यंत पोहोचला असावा. त्यानेसुद्धा पुढील क्षणाला बसमधून माझ्याकडे बघून वर्ल्ड कपचा कप उंचावला,’ असं त्याने लिहिलं.

‘आयपीएल दरम्यान ज्या मुंबईने हार्दिकला ट्रोल केलं. आज त्याच मुंबईकरांचं स्वागत खुल्या दिलाने स्वीकारायला हार्दिक अगदी ड्राइव्हरच्या बाजूला बसलेला. त्याच्या पाठोपाठ अर्ध्या अर्ध्या सेकंदसाठी दर्शन झालं ते द वॉल राहुल द्रविड, गरजेच्या क्षणी उभा राहणारा बुम बुम बुमराह, दुखापतीवर मात करून दमदार पुनरागमन करणारा ऋषभ पंत आणि सगळेच, आमचा बोरिवलीकर रोहित, विराट, सूर्या सगळ्यांनाच सॅल्युट ठोकायचा होता. गर्दी जमणे आणि जमवणे यातील फरक पाहिला. स्वागतासाठी अशी गर्दी स्वतःहून जमली पाहिजे. टीम इंडिया चॅम्पियन्स तुम्हाला प्रचंड प्रेम आणि अभिमान मित्रांनो भावांनो,’ अशा शब्दांत प्रसादने भावना व्यक्त केल्या.

पहा व्हिडीओ

ट्रोलिंगला उत्तर

प्रसादच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हार्दिक पांड्याने माझ्याकडे बघून वर्ल्ड कपचा कप उंचावला, यावरून अनेकांनी त्याला ट्रोल केलं. या ट्रोलिंगला उत्तर देत प्रसादने लिहिलं, ‘थँक्स भावांनो आणि बहिणींनो, आयुष्यात पहिल्यांदाच ट्रोल झालोय. म्हणून गंमत म्हणून कमेंट करतोय. कदाचित तुम्ही माझी पूर्ण पोस्ट वाचली नसेल. मला हार्दिकने ओळखलं असं मी कुठेच म्हटलं नाहीये. टेलिपथी नावाची एक गोष्ट असते, त्याबद्दल बोललोय. हार्दिकने काल जसं शंभर करोड लोकांकडे बघून कप उंचावला त्यातला मी एक होतो. तुमच्या सारखाच भारताचा अभिमान असणारा आणि इंडियन क्रिकेट टीमचा फॅन. भारत जिंकलाय आणि त्याचा मला प्रचंड अभिमान आणि आनंद आहे हे सांगायचं होतं. पण वेगळा अर्थ काढला गेला. असो… तुम्हा सगळ्यांना आपल्या या विजयाच्या प्रचंड शुभेच्छा.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;