शनिमहाराजांचे चौथऱयावरील थेट दर्शन दोन महिन्यांसाठी बंद
श्रीक्षेत्र शनिशिंगणापुरात चौथरादुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम सुरू असून, कृष्णलीला ग्रॅनाइट नक्षीदार दगड बसविण्याचे काम हाती घेतले आहे. हे दुरुस्तीचे काम दोन महिने चालणार असल्याने शनिमहाराजांची चौथऱयावरील थेट दर्शनव्यवस्था बंद करण्यात आली आहे. आता काम पूर्ण होईपर्यंत शनिभक्तांना शनिमहाराजांच्या चौथऱयावरील थेट दर्शनासाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. चौथरा सुशोभीकरणामुळे मंदिर परिसराचे रूपडे पालटणार आहे.
शनिमहाराजांचा चौथरा आकर्षक व्हावा, यासाठी पुणे येथील उद्योगपती ‘वेंकीज् ग्रुप’चे व्यंकटराव यांनी 60 लाख रुपये खर्चून दुरुस्तीचे काम करण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी श्री शनैश्वर देवस्थानने परवानगी दिली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कर्नाटक व तामीळनाडू राज्यांतील खाणींत काळा ग्रॅनाइट कृष्णलीला दगड घडविण्याचे काम सुरू होते. मागील महिन्यात हे दगड मंदिरात दाखल झाले असून, आठ दिवसांपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
नक्षीदार ग्रॅनाइट दगड बसविण्याचे काम कारागिरांनी सुरू केले असून, चौथरादुरुस्ती व सुशोभीकरणाचे हे काम दोन महिने चालणार आहे. त्यामुळे शनिमहाराजांचे थेट चौथऱयावर जाऊन दर्शन घेणाऱया भाविकांना आता दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या मूळ चौथऱयाच्या बाजूने खोदाई व पीचिंगचे काम संपले असून, आता दगड बसविण्याचे काम सुरू आहे. सध्याचा 18 बाय 18 असणारा चौथरा रुंदी वाढवून 21 बाय 21 करण्यात आला आहे. तीन फूट उंच व 16 इंच रुंद असलेला दगड या आकारात आहे. त्याच दगडात पायऱया व चौथऱयाच्या जागेवर शिल्पकला साकारणार आहे.
हे काम कर्नाटकातील कॉण्ट्रक्टर व मजूर काम करीत आहेत. चौथरादुरुस्तीमुळे शनिभक्तांना थेट चौथऱयावरील प्रवेश बंद असल्याने आता दोन महिन्यांनंतर दर्शनव्यवस्था खुली होण्यासाठी भाविकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List