जगभरातून बातम्यांचा थोडक्यात आढावा
अंतराळवीरांचा मुक्काम वाढणार
नासाच्या अंतराळ मोहीमेत सहभागी झालेल्या हिंदुस्थानी वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा पृथ्वीवर परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे. नासाची अंतराळ मोहीम 90 दिवसांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सुरूवातीला नासाची ही अंतराळ मोहीम काही दिवसांची असेल असे बोलले जात होते. मात्र ही मोहीम सुरू होऊन आता तीन आठवडे उलटले आहेत. बोईंग स्टारलायनरसह सुनीता सहकारी बुच विल्मोर यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये गेली आहे. मात्र हे दोघेही तेथे अडकून पडले आहेत. नासाने स्पष्ट केले की या दोन्ही अंतराळवीरांचा आणखी काही काळासाठी अंतराळातील मुक्काम वाढणार आहे.
परत आणण्याची घाई नाही
अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्याची कोणतीही घाई नाही, असे नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम मॅनेजर स्टीव स्टिच यांनी सांगितले. नासा स्टारलायनर मिशनचा जास्तीत जास्त कालावधी हा 45 दिवसांनी वाढून 90 दिवस करण्याचा विचार करीत आहे. 5 जूनला दोन्ही अंतराळवीर बोईंग स्टारलायनर पॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनसाठी रवाना झाले होते.
‘क्रिप्टोक्वीन’वर एफबीआयचे 5 लाख डॉलर्सचे बक्षीस; 175 देशांतील लोकांना लावला 4 अब्ज डॉलरचा चुना
आर्थिक फसवणूक करणाऱयांमध्ये पुरुषांप्रमाणे महिलाही आहेत. बल्गेरियन महिला रुजा इग्नाटोवा हिची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एफबीआयने मोस्ट वॉण्टेडच्या यादीत तिला टाकले असून तिच्यावर तब्बल 5 लाख डॉलर्स म्हणजेच 41 कोटी 72 लाख 42 हजार 250 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. रुजा इग्नाटोवाला ‘क्रिप्टोक्वीन’ म्हणून ओळखले जाते. रुजा इग्नाटोवावर बनावट क्रिप्टोकरन्सी वन कॉईनद्वारे 175 देशांतील लोकांकडून 4 अब्ज डॉलरहून अधिक किमतीची गुंतवणूक घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे. तिने 2014 मध्ये आभासी चलन लाँच केले होते.
हिंदुस्थानींचा शिक्षणापेक्षा लग्नावर जास्त खर्च
हिंदुस्थानातील लोक शिक्षणापेक्षा जास्त खर्च लग्न समारंभावर करतात, अशी माहिती गुंतवणूक संस्था जेफरीजने केलेल्या एका अहवालातून समोर आली आहे. हिंदुस्थानात एका लग्नावर सरासरी शिक्षणापेक्षा जास्त खर्च करायला लोक प्राधान्य देतात. हिंदुस्थानातील विवाह बाजार 10.9 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. हा बाजार सध्या चीनपेक्षा कमी असला तरी अमेरिकेपेक्षा दुप्पट आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. हिंदुस्थानी लोक हे किराणा सामानानंतर सर्वाधिक खर्च हे लग्नावर करतात. हिंदुस्थानींचे सरासरी वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये असून ते यापेक्षा किती तरी पट लग्नावर खर्च करतात. हिंदुस्थानात दरवर्षी जवळपास 80 लाख ते 1 कोटी विवाह होतात. ज्वेलरी उद्योगात 50 टक्क्यांपेक्षा अधिक पैसा हा वधूच्या दागिन्यांच्या विक्रीतून होतो. लग्नसराईसाठी लागणाऱया अनेक वस्तूंच्या किमती भरमसाट वाढल्याने लग्न खर्च वाढला आहे.
विक्रम मिस्त्री नवे परराष्ट्र सचिव
विक्रम मिस्त्री यांची देशाचे नवे परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 15 जुलैपासून ते आपला कार्यभार सांभाळणार आहेत. सध्या परराष्ट्र सचिवपदाची धुरा विनय मोहन क्वात्रा यांच्याकडे आहे. मात्र त्यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजीच संपला होता.
ब्रिटनमध्ये 4 जुलैला मतदान
ब्रिटनमध्ये 4 जुलैला मतदान पार पडणार आहे. हिंदुस्थानी वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पंझर्व्हेटिव्ह पक्षाला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता बहुतेक सर्वेक्षणांनी वर्तवली आहे, परंतु खरे चित्र निकालानंतर स्पष्ट होईल.
1 जुलैपासून कार, स्कूटर महागणार
नवीन कार आणि स्कूटर खरेदीचा विचार करणाऱयांना 1 जुलैपासून अधिक पैसे मोजावे लागतील. टाटा मोटर्सने व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 टक्क्यांपर्यंत वाढवल्या. तर हीरो मोटोकॉर्पही निवडक स्कूटर-मोटरसायकलच्या किमतीत वाढ केली.
31 जुलै आयटीआर फाईलची डेडलाइन
देशातील कोटय़वधी नोकरदार वर्गांसाठी आर्थिक वर्ष 2023-24 (मूल्यांकन वर्ष 2024-25) साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै निश्चित करण्यात आली आहे. सरकारकडून कोणतीही मुदतवाढ जाहीर करण्यात आली नाही.
घरी आणून प्यायला सांगा भाजप मंत्र्यांचा महिलांना अजब सल्ला
मध्य प्रदेशात भाजपच्या एका मंत्र्याने महिलांना अजब सल्ला दिला. नवऱयाला जर दारूचे व्यसन असेल तर त्यांना सांगा की, दारू घरी आणून प्या, असा अजब सल्ला मध्य प्रदेशातील सामाजिक न्याय मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी महिलांना दिला. भोपाळमधील आयोजित व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत जनजागृती कार्यक्रमात नारायण सिंह कुशवाह बोलत होते. तुम्हाला तुमच्या नवऱयाने दारू पिणे बंद करावे वाटत असेल तर त्यांना सांगा बाहेर पिऊ नका. घरी आणून प्या, असे ते म्हणाले.
पहिल्याच पावसात अयोध्येचा रामपथ रस्ता खचला सहा अधिकारी निलंबित
ज्या रस्त्यावरून देशभरातून आणि जगभरातून भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी जातात, तो रामपथ रस्ता पहिल्याच पावसात खचला. या रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा आणि खड्डे पडले आहेत. रस्ता नीट बांधला नसल्याने देशभरात यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याची गंभीर दखल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. यात तीन पीडब्ल्यूडी अधिकाऱयांचा समावेश आहे. या रस्त्याचे सिव्हर बनविणाऱया अहमदाबाद पंपनीला नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर जल निगमच्या तीन अधिकाऱयांनाही निलंबित करण्यात आले आहे.
रस्त्यासाठी 844 कोटी रुपये खर्च
या रस्त्यासाठी तब्बल 844 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रस्त्याचे काम घाईघाईने केल्यामुळे खड्डे पडले की, बांधकामाचा दर्जा कमी होता, याची तपासणी करण्यात येत आहे. 12.94 किमीच्या रामपथावर अनेक खड्डे 8 फुटांपेक्षा जास्त खोल पडले. पोस्ट ऑफिस तिराहा ते रिकबगंज चौकादरम्यान रस्त्याची दुरवस्था मोठी आहे. येथील बहुतांश रस्ते खचले आहेत.
व्होडाफोनचेही रिचार्ज महाग
टेलिकॉम कंपनी जिओच्या दरवाढीनंतर एअरटेल आणि आता व्होडापह्न-आयडिया या दोन्ही कंपन्यांनी शुक्रवारी प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाइल दरांमध्ये प्रत्येकी 10 ते 21 टक्क्यांनी वाढ केली. सुमारे अडीच वर्षांच्या कालावधीनंतर दूरसंचार पंपन्यांनी मोठी दरवाढ केल्यामुळे या निर्णयाला महत्त्व आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या विविध प्लॅनमध्ये 10 ते 21 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे. एअरटेलची नवीन दरवाढ पुढील महिन्यात 3 जुलैपासून लागू होईल तर व्होडापह्न-आयडियाने 4 जुलैपासून दरवाढीची घोषणा केली आहे.
युद्ध अभ्यासासाठी शिवालिक सज्ज
दक्षिण चीन समुद्र आणि उत्तरी प्रशांत महासागरात तैनात असलेले हिंदुस्थानी युद्धनौका आयएनएस शिवालिक, रिम ऑफ द पॅसिफिक अभ्यास सरावासाठी पोहोचली. या ठिकाणी जगातील सर्वात मोठा नौदलाचा अभ्यास सराव होणार आहे. हिंदुस्थान आणि जपान यांच्यातील द्विपक्षीय अभ्यास सराव पूर्ण करून आयएनएस शिवालिक पर्ल हार्बर येथे पोहोचली. आयएनएस शिवालिक समुद्रातील शत्रूंना जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहे. प्रति तास 50 किलोमीटरच्या वेगाने चालणाऱया या युद्धनौकेवर बराक आणि ब्रम्होससारखे क्षेपणास्त्र आहे. अमेरिकन नौदलाच्या नेतृत्वात जवळपास 29 देश रिम पॅक – 24 या अभ्यास सरावात सहभागी होत आहेत.
आरबीआयकडून अलर्ट जारी; बँक खात्यावर सायबर हल्ल्याचा धोका
देशातील कोटय़वधी बँक खातेधारकांसाठी एक वाईट बातमी आहे. हिंदुस्थानींच्या बँक खात्यांवर सध्या सायबर हल्ला होण्याची टांगती तलवार आहे, असे सांगत यासंबंधीचा अलर्ट भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केला आहे. सेंट्रल बँकेने बँक खात्यावर सायबर अटॅकचा धोका ओळखून सर्व बँकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सूचना केल्या असून 24 तास अलर्ट राहा, असे म्हटले आहे. बँकांवर सायबर अटॅक होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाल्याचे आरबीआयने म्हटले आहे. सेंट्रल बँकेने सर्व बँका व आर्थिक संस्थांना 24 जून रोजी एक पत्र पाठवून अलर्ट दिला आहे. सर्विलान्सची क्षमता वाढवा आणि उर्वरित उपायसुद्धा वापरा, असे बँकांना सांगण्यात आले आहे. याआधीही सीईआरटी-इनने गेल्या वर्षी यासारख्या धोक्याची सूचना जारी केली होती.
मोबाईल नंबर पोर्टसाठी सात दिवस थांबावे लागणार; 1 जुलैपासून नवा नियम
सिमकार्ड बदलल्यानंतर मोबाईल नंबर पोर्ट केल्यास आता सात दिवस थांबावे लागणार आहे. यासंबंधीचा नवा नियम येत्या 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने मोबाईल पह्न नंबरवरून आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी हा नवीन नियम आणला आहे. याआधी मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी दहा दिवस वाट पाहावी लागत होती. परंतु आता नव्या नियमामुळे केवळ सात दिवस वाट पाहावी लागणार आहे. ट्रायकडून 14 मार्च 2024 ला जारी करण्यात आलेल्या मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (नववे संशोधन) नियम 1 जुलै 2024 पासून लागू होईल.
एक रुपयाच्या वादातून तरुणाच्या 23 वर्षे कोर्टात चकरा
क्षुल्लक वाद म्हणजे काय असतो, याची प्रचीती पुन्हा एकदा आली आहे. अवघ्या एक रुपयाच्या वादातून घडलेल्या घटनेमुळे एका तरुणाला तब्बल 23 वर्षे कोर्टाच्या फेऱया माराव्या लागल्या. ही घटना चंदिगढमधील आहे. राजू गुरांग नावाच्या एका 18 वर्षीय तरुणाने विजय कुमारच्या दुकानातून सिगारेट खरेदी केली होती. तसेच एक तंबाखूचे पाकीटही घेतले. विजयने एक रुपया मागितला. राजूने सुट्टे पैसे नाहीत, असे सांगितले. परंतु विजय ऐकायला तयार नव्हता. त्याने तंबाखूचे पाकीट परत घेतले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हाणामारीही झाली. राजूने विजयला लाथ मारली. त्यामुळे तो खाली दगडावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला. नंतर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. राजूविरुद्ध गुन्हा दाखल केला. चंदिगढ न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली. परंतु तो गेल्या 23 वर्षांपासून कोर्टात येरझऱया मारत आहे. 23 वर्षांनंतर कोर्टाने त्याची सुटका केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List