मुहूर्त ठरला! म्हाडाच्या मुंबईतील 1900 घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत!!
मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱयांसाठी खूशखबर आहे. मुंबईतील 1900 घरांसाठी जुलै महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असून ऑगस्टमध्ये सोडत काढण्याची तयारी म्हाडाने सुरू केली आहे.
खासगी विकासकांच्या घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा असल्याने मुंबईत घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे परवडणाऱया घरासाठी सर्वसामान्य म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहतात. म्हाडाच्या मुंबई मंडळाने ऑगस्ट 2023 मध्ये मुंबईतील जवळपास चार हजार घरांची लॉटरी काढली होती. त्यासाठी तब्बल सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते. यंदाच्या वर्षी म्हाडाची लॉटरी कधी प्रसिद्ध होणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाने जवळपास 1900 घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील ही घरे सर्व उत्पन्न गटासाठी असणार आहे. या घरांसाठी जुलैमध्ये लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होईल. ऑगस्टमध्ये सोडत काढली जाईल, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
गोरेगावमधील 332 हायफाय घरांचा समावेश
म्हाडाने प्रथमच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी गोरेगाव प्रेमनगर येथे तब्बल 332 हायफाय घरांची उभारणी केली आहे. 800 आणि 1000 चौरस फुटांच्या सदनिका खासगी विकासकाप्रमाणे बांधल्या आहेत. त्यांचाही या लॉटरीत समावेश केला जाणार आहे. या हायफाय घरांच्या किमती काय असणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List