छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी पुण्यात रास्ता रोको; कठोर कायदा करण्याची आंदोलकर्त्यांची मागणी
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष व राष्ट्रीय प्रतीके यांच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यात शुक्रवारी सकाळी 11 वाजता ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पुण्यात नवले ब्रिज, गाडीतळ हडपसर, किवळे न्यू मुंबई-पुणे हायवे लोढा सोसायटीजवळ, पिंपरी-चिंचवड येथे हे आंदोलन करण्यत आले आहे.
महापुरुषांचा वारंवार होणारा अपमान, काही दिवसांपूर्वी हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर झालेली दगडफेक या घटना सामाजिक बंधुतेला काळिमा फासणाऱ्या व सकल हिंदूंचा अपमान करणाऱ्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी आणि सामाजिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणणारा गुन्हेगारांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देणारा’ कायदा पारित करावा, या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन केले जात आहे.
संविधानाने राष्ट्रीय पुरुष आणि प्रतिके यांचा सन्मान करणे हा मूलभूत कर्तव्याचा भाग म्हणून नमूद केले आहे. देशाची एकता आणि एकात्मता याना जोडणारे काही राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय प्रतिके यांचा महाराष्ट्रात सतत चालू असणारा अपमान पुण्यातील हडपसर येथील घटनेने अधोरेखित केला आहे. सामाजिक बंधुतेला काळीमा फासणारी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेक करणारी घटना ही राष्ट्राचा व हिंदूंचा अपमान करणारी घटना आहे. ही घटना एक भारतीय म्हणून आणि हिंदू समाज म्हणून सहन होणे शक्य नाही.
हिंदूंची अस्मिता असणारे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संतापाची लाट आहे. सतत एक ठराविक समाज ठरवून, कट रचून, पूर्वतयारीने फक्त हिंदू प्रतिकांचा आणि राष्ट्रपुरुषांचा व राष्ट्रप्रतिकांचा अपमान पुण्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारने ‘राष्ट्रपुरुष व राष्ट्रपतिके यांचा अपमान करून सामाजिक शांतता, सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देणारा कायदा पारित करावा, अशी आमची मागणी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List