‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’असा अर्थसंकल्प आहे; जयंत पाटील यांचा हल्लाबोल
राज्याच्या अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. महाविकास आघाडीकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच हा अर्थसंकल्प म्हणजे जुमलेबाजी असून यात फक्त थापांचा महापूर आहे, अशी टीकाही विरोधकांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकांचा देशासह राज्यात चांगलाच परिणाम दिसत आहे. आता पराभव समोर दिसत असताना, जनतेला भूलवण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे, असे विरोधकांनी म्हटले आहे. अगदी बेजबाबदारपणे मांडलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. निवडणुकीच्या आधी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून मग ते वाढवायचे ही पंतप्रधान मोदींची पद्धत राज्यात राबवली गेली आहे. निवडणुका झाल्या की पुन्हा दर वाढवले जातील, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
महाराष्ट्राच्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करत आहात तर तो सक्षमपणे करा. फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. कसलेही मूल्यमापन न करता, बेजबाबदारपणे अर्थसंकल्प सादर केलेला आहे. हे बजेट फक्त दोन महिन्यांचे आहे. हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर, आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ तेव्हा आम्ही जबाबदारीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचा काम करू, असा दावा जयंत पाटील यांनी केला. आर्थिक तरतूदींचा विचार केला तर ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’असा हा अर्थसंकल्प आहे, असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List