संदीप पाठकच्या ‘जगात भारी पंढरीची वारी’तून विठू-रखुमाई भक्तांना घरबसल्या वारीचं दर्शन
आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. असंख्य वारकरी तन्मयतेने, निरपेक्षपणे त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी जातात. हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. जीवन समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे भूषण आहे.
ही पंढरीची वारी तीनशे ते चारशे वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्त्व काय? उदिष्ट्य काय? याविषयी क्वचितच माहिती असते. हाच इतिहास, वारीची दिव्य परंपरा गाण्याच्या माध्यमातून सोप्या आणि सध्या शब्दात उलगडण्यात आला आहे.
अभिनेता संदीप पाठकने 'जगात भारी पंढरीची वारी' हे चैतन्यमय गाणं पांडुरंगाच्या भक्तांसाठी आणलं आहे. वारीचा आनंदानुभव देणारं हे गाणं गीतकार गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलं आहे. मनीष राजगिरे यांचा आर्त स्वर या गाण्याला लाभला असून विजय गवंडे यांनी गाण्याला संगीत दिलं आहे.
अभिनेता संदीप पाठक गेली काही वर्षे या वारी सोहळ्यात सहभागी होतोय. याबद्दल तो म्हणाला, "हा आनंद जगात कुठेच नाही आणि तो मिळणारही नाही. त्यामुळेच मी या वारीत सहभागी होत आहे. वारीत सहभागी होणारा प्रत्येकजण समाधानाची वाट शोधत असतो."
"ज्यांना वारीचा सोहळा अनुभवायला मिळत नाही अशांपर्यंत वारीचा प्रत्येक क्षण पोहोचवणं, घरबसल्या वारीचं दर्शन त्यांना करून देणं आणि नव्या पिढीला या परंपरेची ओळख व्हावी यासाठी 'जगात भारी पंढरीची वारी' या कार्यक्रमाच्या आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून वारीच्या अनुभवाचं हेच संचित मनोरंजनाच्या माध्यमातून मी गेली काही वर्ष सातत्याने देत आलो आहे," असं त्याने सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List