अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापूर, विधानसभा निवडणुकीत जनता हिसका दाखवेल; उद्धव ठाकरे कडाडले

अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापूर, विधानसभा निवडणुकीत जनता हिसका दाखवेल; उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी विधानभवनात उपस्थित होते. त्यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना सत्ताधाऱ्यांना झोडपून काढले. हा अर्थसंकल्प म्हणजे गाजराची पुंगी आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी असून थापांचा महापूर आहे. अर्थसंकल्पात जुमलेबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीही निवडून देणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

गेले दहा वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि भूलथापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने त्यांना जो काही दणका दिला. त्या दणक्याने आता यांचे डोळे थोडेसे किलकिले झाल्यासारखे वाटत आहेत. तरीही जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असे मला वाटत नाही. महाराष्ट्रातील जनता सुजाण, सज्ञान आणि स्वाभिमानी आहे. कितीही यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तरी देखील महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचे षडयंत्र आता उघड झालेले आहे. आता महाराष्ट्र हा गुजरातच्या मागे पडलेला आहे. यांचा प्रयत्न हाच आहे की काहीतरी धूळफेक करायची, जनतेला फसवायचं, रेटून खोटं बोलायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्र लुबाडयला सुरवात करायची. अनेकदा निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात. आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती, त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे. सगळ्या च घटकांना आपल्यासोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न आहे, ज्याला देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असंच अर्थसंकल्पाचं वर्णन करावं लागेल, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणाला.

अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही उल्लेख नाही. महाविकास आघाडीची अशी मागणी आहे, आजपर्यंत गेल्या दोन वर्षात ज्या घोषणा केल्या, त्यापैकी अंमलात आल्या त्याच्याबद्दल एक तज्ज्ञांची कमिटी निवडून निवडणुकीपूर्वी एक श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक योजना अशा आहेत ज्या घोषित झाल्या पण प्रत्यक्षात आल्या नाहीत. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना मतदानात आपल्या बाजूने करुन घेण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतो. आम्ही आधीच म्हटलं होतो, महिलांसाठी लाडकी लेक किंवा लाडकी बहिण योजना आणत असाल तर जरुर आणा आम्ही स्वागत करतो. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठीही आणा. त्याच्याबद्दल कुठे काही वाच्यता नाही. माता-भगिनींना तुम्ही काही देत आहात जरुर द्या. पण त्याच वेळेला आवर्जून सांगेन राज्यात हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता-भगिनी त्याला काय उत्तर देणार या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही. म्हणजेच रोजगार वाढीसाठी कुठेही उपाययोजना नाहीत. जे काही आहे ते रेटून न्यायचं, असे त्यांचे धोरणा असल्याचे ते म्हणाले.

आपण शेतकऱ्यांना वीजबील माफ करण्याची मागणी केली होती ती त्यांनी मान्य केली. पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी काही त्यांनी मान्य केली नाही. शेतकऱ्यांना वीजबील थकबाकीसह माफ करणार आहात का? शेतकऱ्यांची बी-बियाणांचा प्रश्नही अजून तसाच आहे. शेतकऱ्याला एका बाजूने लुटायचं आणि दुसऱ्या बाजूने उदारपणाचा आव आणायचा. हे सर्व ढोंग शेतकरी भोगत आहेत. सरकारला वाटत असेल अशा काही खोट्या मलमपट्ट्या दाखवण्यासारखं केलं की हे सर्व चि़डलेले लोकं शांत होतील तर असं अजिबात होणार नाही. शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील जनता पुन्हा वाट बघतेय की विधानसभेच्या निवडणुका कधी होतायत. मला खात्री आहे की यांचं हे ढोंग आहे हे लबाडाघरचं आवताण आहे. या खोट्या गोष्टी आहेत. कर्जबाजारी शेकतऱ्यांना काय मदत करणार, शेतकऱ्यांच्या हमीभावाचे काय होणार, याची उत्तरे अर्थसंकल्पात नाहीत, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.

अच्छे दिन आयेंगे, 15 लाख रुपये येतील याबद्दल कुणी बोलत नाही. तसं निवडणूक झाल्यानंतर सांगतील हे तर जुमले होते. हा अर्थसंकल्प आहे की जुमला संकल्प आहे. त्या जुमलाबाजीला लोक आता भीक घालणार नाहीत. कितीही काही करण्याचा आव आणला तरी जनता यांना फसणार नाही. जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना निवडून देईल असं वाटत नाही. दिंडींना अनुदान देण्याचा निर्णय म्हणजे वारकऱ्यांचा अपमान आहे. वारकरी हजारो लाखोंच्या संख्येने जातात त्यांना मंदिरात त्यांना प्रवेश मिळत नाही. एवढी गर्दी असते की त्यांना जाताही येत नाहीत. पण त्या मंदिराचा कळस बघून आयुष्य सार्थकी लागलं असं समजतात, त्यांना तुम्ही पैशाचा लोभ दाखवू शकत नाही. वारकऱ्यांना पैशांची गरज कधीही लागली नाही. आता त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न आहे काय? मात्र, वारकरी अशा भूलथापांना भूलणार नाही, असेही ते म्हणाले.

मौलाना आझाद योजनेची तरतूद वाढली आहे म्हणजे या सरकारने हिंदुत्व सोडले आहे का? यात काहीही नाही, ही फक्त गाजराची पुंगी आहे. हा गाजर दाखवण्याचा अर्थसंकल्प आहे. यात कोणताही आर्थिक तरतूद दाखवलेली नाही. माझे राज्य कर्जबाजारी होत असेल तर मोदी पैसे देणार आहेत काय. राज्य संकटात असेल तर शिक्षण, आरोग्यसेवा द्या, आमची महाराष्ट्राची जनता कर्तबगार आहे. आता ते भूलथापांना बळी पडणार नाही. महाराष्ट्र कर्तबगार असताना इतर राज्यांच्या मागे कसा पडतो, असा प्रश्न पडतो. महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न होत आहे, महाराष्ट्र लुटणाऱ्यांना जनता पुन्हा निवडून देणार नाही. महाराष्ट्रातील जनता मोदींवर अवलंबून राहायला हवी, असे त्यांना वाटते, मात्र, महाराष्ट्रातील जनता ही विधानसभेत हिसका दाखवतील, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;