लाच मागितल्याप्रकरणी नगरच्या आयुक्तांसह सहाय्यकावर गुन्हा; दोघेही फरार, शोधासाठी तपास पथके रवाना
नगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे तसेच त्यांचे स्विय सहायक श्रीधर देशपांडे यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर हे दोघेही फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तीन पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
महापालिका आयुक्तांचे स्विय सचिव श्रीधर देशपांडे याच्या घराची पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या पथकाने झडती घेतली असता 93,000/- रूपये रोख रक्कम, साडे आठ तोळयांचे सोन्याचे दागिने तसेच एकंदरीत नऊ मालमत्ता संदर्भातील कागदपत्रे आढळली आहेत. सदर मालमत्ता नगर शहरातील उच्चभ्रु वस्तीमध्ये, उपनगरांमध्ये खरेदी केल्याची कागदपत्रे मिळून आली आहेत. तसेच बीड जिल्ह्यात देखील शेत जमीन खरेदी केल्याचे दिसून येत आहे.
तसेच एक चारचाकी वाहन, दोन इलेक्ट्रॉनिक मोपेड मोटार सायकल, दोन मोटार सायकल आढळल्या आहेत.
बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी पंचांसमक्ष आठ लाख रूपयांची मागणी केल्याने तोफखाना पोलीस स्टेशन, नगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नगर हे करत आहेत.
दरम्यान, गुरुवारी नगर महानगरपालिकेचे आयुक्तांचे दालन पोलिसांनी अचानकपणे ताब्यात घेतलं होतं. त्याचवेळी कारवाईला सुरुवात झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List