बाणगंगा परिसराचा विकास आता पुरातत्व विभागाच्या समन्वयानेच! गाळ हस्तचलित यंत्रणेतूनच काढणार
ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पायऱ्या कंत्राटदाराकडून तोडल्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाल्यामुळे आता बाणगंगा परिसराचा विकास आता पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानेच केला जाणार आहे. शिवाय तलावातील गाळ हस्तचलित यंत्रणेच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे. पालिका आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी यांनी आज या ठिकाणी पाहणी करून प्रशासनाला हे आदेश दिले. शिवाय बेजबाबदारपणे पायऱ्यांचे नुकसान करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
ऐतिहासिक बाणगंगा तलाव व परिसरात पालिकेच्या माध्यमातून पुनरुज्जीवनाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी आयुक्तांनी आज केली. या वेळी ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे आदी अधिकारी उपस्थित होते. ऐतिहासिक बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्पअंतर्गत कामे करताना तलावाच्या उत्तर प्रवेशद्वारावरून आतमध्ये एक्सकॅव्हेटर संयंत्र उतरवून तलावांच्या पायऱ्यांची हानी केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारास महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वीच ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तलावास हानी पोहोचवून नुकसान केल्याबद्दल मलबार हिल पोलीस ठाण्यात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हानी पोहोचलेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याची कामे पालिकेच्या वतीने त्याच दिवशी करण्यात आली आहेत.
महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागाच्या माध्यमातून बाणगंगा परिसरात पर्यटनस्थळ विकासासाठी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. तलाव परिसरातील बांधकामे ‘डी’ विभागामार्फत निष्कासित करण्यात आली आहेत.
तसेच दीपस्तंभ आणि पुरातन वारसा जतनाची (हेरिटेज) कामे पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शशी प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. या कामांमध्ये आवश्यक आदर ठेवून काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
तलावाच्या पायऱयांची हानी केल्याबद्दल बाणगंगा प्रकल्पाचे कंत्राटदार मे. सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List