संसदेत सेंगोल विरुद्ध संविधान; विरोधक आणि सत्ताधारी भिडले

संसदेत सेंगोल विरुद्ध संविधान; विरोधक आणि सत्ताधारी भिडले

संसदेत सेंगोल विरुद्ध संविधान असा संघर्ष सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झाला आहे. लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ लावण्यात आलेला सेंगोल हटवून त्या ठिकाणी संविधान ठेवा, अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली आहे. तर सत्ताधारी पक्षात असलेल्या भाजपने सेंगोल हे देशाचे प्रतीक असून ते आता कुणी हटवू शकत नाही, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांपुढे केलेल्या अभिभाषणावेळी विरोधकांनी ‘नीट…नीट…’ अशी घोषणाबाजी करत प्रचंड गदारोळ केला.

नव्या संसद भवनात स्थापित करण्यात आलेल्या सेंगोलवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. लोकशाही वाचवायची असेल तर संसदेत सेंगोल नको तर संविधान हवे, अशी आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतली आहे. समाजवादी पार्टीचे खासदार आर. के. चौधरी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून सेंगोल हे राजेशाहीचे प्रतीक असल्याने ते हटवून त्या ठिकाणी संविधान स्थापित करावे, अशी मागणी केली आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्याचे समर्थन केले आहे. कॉँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि राष्ट्रीय जनता दलाच्या मिसा भारती यांनीही सेंगोल संसदेतून हटविण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे. तर भाजप खासदार खगेना मुर्मू, महेश जेठमलानी यांनी विरोधी पक्षाकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचे सांगत सेंगोल हटविण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.

अखिलेश यादव काय म्हणाले?
संसदेत पहिल्यांदा जेव्हा सेंगोल ठेवण्यात आला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या सेंगोलला नमस्कार केला होता. मात्र यावेळी खासदारकीची शपथ घेताना सेंगोलचा मोदींना विसर पडला याची आठवण करून देण्यासाठी आमच्या खासदाराने पत्र लिहिले, असे सपा नेते अखिलेश यादव म्हणाले.

भाजपला दाक्षिणात्य संस्कृती समजणार नाही – रेणुका चौधरी
भाजपला कधीही दाक्षिणात्य संस्कृती समजणार नाही. तामीळ संस्कृती म्हणजे फक्त सेंगोल नाही. तर त्या संस्कृतीत सर्वाधिक बुद्धिमान लोक आहेत. भाजपने आपल्या मनाने सेंगोल लावला. सभागृह हे सर्वांना सोबत घेऊन चालत असते, असे सांगत कॉँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यानी सपाची मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे.

हा तामीळ संस्कृतीचा अपमान – योगी आदित्यनाथ
सेंगोल हटविण्याची मागणी करून समाजवादी पक्षाने तामीळ संस्कृतीचा अपमान केला आहे. ‘इंडिया’ आघाडीलाही हा अपमान सहन होत आहे. कारण संस्कृतीचा अपमान करणे हेच काँग्रेसही करत आले आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

ही लोकशाही आहे, राजेशाही नाही – मिसा भारती
भारत हा लोकशाही मानणारा देश आहे. ही लोकशाही आहे, राजेशाही नाही. त्यामुळे सेंगोलला आता संग्रहालयात ठेवला पाहिजे म्हणजे तो संग्रहालयाला भेट देणाऱया अभ्यासकांना, पर्यटकांना पाहता येईल, असे सांगत लालूप्रसाद यादव यांच्या कन्या आरजेडीच्या नेत्या मिसा भारती यांनी सेंगोल संसदेतून हटविण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे.

देश संविधानाने चालणार की राजाच्या छडीने?
भाजपच्या सरकारने संसद भवनात अध्यक्ष बसतात तिथे सेंगोल स्थापित केला आहे. सेंगोल म्हणजे ‘राजदंड’. अर्थात राजाची छडी. देश संविधानाने चालणार की राजाच्या छडीने, असा सवाल आर.के. चौधरींनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;