शाळा सुरू झाली तरी पाठय़पुस्तके नाहीत; दुसरी ते आठवीचे 50 टक्के विद्यार्थी पुस्तकाविना, युवासेनेची राज्य प्रकल्प संचालकांकडे तक्रार
शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले तरी दुसरी ते आठवीच्या निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप पाठय़पुस्तकेच मिळालेली नाहीत. अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मोफत पाठय़पुस्तकांचा पुरवठा होतो, मात्र काही पालकांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठय़पुस्तकेच न मिळाल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार युवासेनेने अनुदानित शाळांमध्ये पाठय़पुस्तकांचा अपुरा पुरवठा होत असल्याची बाब राज्य शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांच्या निदर्शनास आणून दिली.
मुंबई विद्यापीठ युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी डांगे यांच्याकडे अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप मोफत पाठय़पुस्तके मिळाले नसल्याची तक्रार केली. यावेळी डांगे यांनी सांगितले, पाठय़पुस्तकांची संख्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आहे, परंतु वाटपामध्ये सुसूत्रता नसल्यामुळे हा प्रकार झाला असावा. याची चौकशी करून लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके मिळण्याची व्यवस्था केली जाईल.
पाठय़पुस्तकाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपाचा घोळदेखील समोर आला आहे. या प्रकरणाचीही चौकशी करण्यात यावी. शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया सर्व सुविधा तातडीने देण्याकडे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष घालावे, अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List