मरीन ड्राईव्ह येथील घटना, जांबाज पोलिसांनी समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचवले
मरीन ड्राईव्ह येथील समुद्रात बुडत असलेल्या एका 59 वर्षीय महिलेला दोघा पोलिसांनी जीवदान दिले. समुद्राला भरती आलेली असताना त्यात ती महिला समुद्रात पडली. हे समजताच तेथे तैनात असलेल्या दोघा पोलिसांनी जिवाची पर्वा न करता समुद्रात झोकून देत त्या महिलेला सुखरूप बाहेर काढले.
माटुंगा येथे राहणाऱया स्वाती कनानी (59) ही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे हद्दीतील सुंदर महल जंक्शन या ठिकाणी समुद्रकिनाऱयाच्या कठडय़ावर येऊन बसली होती. दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास त्या समुद्रात बुडत असल्याचे तेथे तैनात असलेल्या सीपीआर प्लाटूनमधील पोलिसांच्या नजरेस पडली. मग अंमलदार किरण ठाकरे आणि अमोल दहिफळे यांनी रस्सी, लाईफ जॅकेट, टायर आदी साहित्य घेऊन थेट समुद्रात स्वतःला झोकून दिले. भरतीमुळे समुद्राला उधाण आलेले असतानाही पोलिसांनी त्याची पर्वा न करता समुद्रात उडी टाकून कनानी हिला सुखरूप बाहेर काढले. कनानी हिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. कनानी ही नैराश्यामध्ये असून ती समुद्रकिनारी येऊन कठडय़ावर बसली होती. त्यावेळी तिची पर्स खाली पडली. पर्स घेण्याच्या प्रयत्नात असताना तिचा पाय घसरला आणि ती समुद्रात पडल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List