घरच्या जबाबदारीमुळे बाळ नको, घटस्फोटित महिलेची गर्भपातासाठी याचिका
वडिलांचे निधन झाले आहे. लहान मुलगी आहे. आई आणि भावाची जबाबदारी आहे. त्यामुळे गर्भपातास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका एका घटस्फोटित महिलेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
अॅड. तेजस दांडे यांच्यामार्फत ही याचिका दाखल झाली आहे. न्या. अजय गडकरी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने या महिलेच्या वैद्यकीय चाचणीचे आदेश दिले. ही चाचणी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व्हावी अशी विनंती अॅड. दांडे यांनी केली. त्यास मान्यता देत उद्या, शुक्रवारीच वैद्यकीय चाचणी करून त्याचा अहवाल सोमवारी न्यायालयात सादर करा, असे आदेश खंडपीठाने दिले. सोमवारऐवजी मंगळवारी हा अहवाल सादर करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
काय आहे प्रकरण
माझा घटस्फोट झाला आहे. वडिलांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. मुलगी, आई व भाव हे माझ्यावर निर्भर आहेत. घटस्फोटामुळे मी मानसिक ताणात आहे. मी खासगी पंपनीत कामाला आहे. तेथे एकासोबत माझी चांगली मैत्री झाली. आमच्यात शारीरिक संबंध झाले. जानेवारी 2024 मध्ये माझी मासिक पाळी चुकली. ताणामुळे हे घडले असावे असा माझा समज झाला. नंतर गर्भधारणा झाल्याचे मला कळाले. गर्भ 26 आठवडय़ांचा आहे. घटस्फोटानंतर झालेले बाळ समाज स्वीकारणार नाही. बाळ जन्माला आले तरी ते मी दत्तक देईन. गर्भपातास परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List