CBI च्या सूत्रांनी खोट्या बातम्या पसरवल्या; केजरीवाल यांचा आरोप, न्यायालयात मांडली स्पष्ट भूमिका
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बुधवारी CBI ने पुन्हा अटक केली. कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात केजरीवालांनी आरोप फेटाळण्याचा केलेला प्रयत्न टाळण्यासाठी CBI ने थेट दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयासमोर हा विषय उपस्थित केला.
पंजाब आणि गोवा निवडणूक प्रचारासाठी ₹ 100 कोटी रुपयांच्या मद्य परवान्याची विक्री केल्याच्या आरोपांप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने केजरीवाल यांना मार्चमध्ये पहिल्यांदा अटक केली होती. यावेळी मनीष सिसोदिया यांच्यावर आपण कोणत्याही प्रकारचा दोषारोप केल्याचं वृत्त त्यांनी फेटाळून लावलं.
सिसोदिया यांना ईडीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक केली होती आणि ते तुरुंगात आहेत.
‘सीबीआयच्या सूत्रांकडून मीडियामध्ये एक खोटी कथा पसरवली जात आहे – की मी मद्य धोरण घोटाळ्याचा ठपका सिसोदियाजींवर ठेवला आहे. मी त्यांच्यावर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीवर असे दोषारोप करणारे कोणतेही विधान केलेले नाही’, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.
‘मी म्हटलं होतं सिसोदियाजी निर्दोष आहेत… आम आदमी पक्ष निर्दोष आहे… आणि मी निर्दोष आहे. पण सीबीआयची योजना मीडियामध्ये आमची बदनामी करण्याचा आहे. सीबीआयच्या सूत्रांनी खोट्या बातम्या पसरवल्या, कृपया याची नोंद करा…’, असं केजरीवाल न्यायालयात म्हणाले.
CBI ने न्यायालयात दावा केल्यावर केजरीवाल यांनी आक्षेप घेतला. केजरीवाल यांनी सीबीआयचा आरोप फेटाळून लावला.
‘CBI माझी बदनामी करत आहे… AAP ला बदनाम करत आहे. मी निर्दोष आहे आणि सिसोदिया जी देखील निर्दोष आहेत’, असं ते वारंवार म्हणाले.
त्यानंतर न्यायालयानं त्याचा मुद्दा नोंदवून घेतला. केजरीवाल न्यायालयात पुढे बोलत राहिले, यावेळी त्यांनी गेल्या वर्षी केंद्रीय तपास यंत्रणेला काय सांगितले ते उघड केले.
‘मी त्यांना (CBI) सांगितले की तीन मुद्दे आहेत. पहिला – महसूल वाढवा. दुसरा – कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठी गर्दी कमी करा. तिसरे – दारूची दुकाने योग्य प्रमाणात उघडा (म्हणजेच संपूर्ण शहरात समान वितरण)’, असं त्यांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात सांगितलं.
सिसोदिया यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी मनीष सिसोदिया यांना धोरणात या तीन गोष्टी लक्षात ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत’.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादांना उत्तर देताना, तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितलं की ते दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध कधीही, ‘निवडणुकीदरम्यान देखील’ कारवाई करू शकतात. मात्र, न्यायालयाच्या परवानगीनेच कारवाई केल्याचे CBI ने सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List