इचलकरंजीत गटारीत पडून चिमुकल्याचा मृत्यू
घरात खेळत खेळत उंबरठा ओलांडून गटारीत पडल्याने 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शहरानजीकच्या चंदुर गावात घडली. शौर्य सतीश पुजारी असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
चंदुर येथील महासिद्ध मंदिरासमोरून जाणाऱ्या जुन्या बाजार रस्त्यावर पुजारी कुटुंबीय राहत आहेत. अभियंता असलेल्या सतीश पुजारी यांचा 11 महिन्यांचा मुलगा शौर्य घरात नेहमीप्रमाणे खेळत होता. खेळत खेळत शौर्य घराचा उंबरठा ओलांडून बाहेर गेला आणि घरासमोरील गटारीत पडला. गटार तुंबून त्यात गाळ साचला होता. गटारीतील पाण्यात गुदमरून शौर्यचा मृत्यू झाला.
शौर्य घरात दिसत नसल्याने कुटुंबीय हादरले. त्यांनी शोधाशोध केली असता, शौर्य घरासमोरील गटारीमध्ये पडल्याचे दिसून आले. त्याला तातडीने उपचारांसाठी इचलकरंजीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसांत करण्यात आली आहे. शौर्यच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List