सरकारला मिळाले 11300 कोटी रुपये; 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव 7 फेऱ्यात संपला
देशातील दुसरा 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव बुधवारी दुपारी सात फेऱयानंतर संपला. हा लिलाव एक दिवसापेक्षा थोडा जास्त काळ चालला. यातून सरकारला सुमारे 11 हजार 300 कोटी रुपये मिळाले आहेत.
या लिलावात भारती एअरटेलने सर्वाधिक बोली लावल्याचे समजते. यामध्ये कमी किमतीच्या सब गिगाहर्ट्झ 900 मेगाहर्ट्झ बँड तसेच 1800 आणि 2100 मेगाहर्ट्झ बँडमधील स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. रिलायन्स जिओने 1800 मेगाहर्ट्ज बँडमधील 5जी बँडविड्थ खरेदी केली, तर व्होडाफोन आयडियाने 900/1800/2500 मेगाहर्ट्ज बँडमधील स्पेक्ट्रम खरेदी केले.
एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने या वर्षी ज्या टेलिकॉम सर्कलमध्ये त्यांच्या परमिटची मुदत संपत आहे तेथे स्पेक्ट्रम खरेदी करण्याचे आवश्यक धोरण मोठ्या प्रमाणात स्वीकारले. या वेळी सरकारने 10.5 गीगाहर्ट्झ 5 जी एअरव्हेव्जची ऑफर दिली होती, ज्याची किंमत आरक्षित मूल्यावर 96,238.45 कोटी रुपये होती. जुलै 2022 मध्ये 5 जी एअरवेव्हच्या विक्रीतून जमा झालेल्या विक्रमी 1,50,173 कोटी रुपयांपेक्षा सरकारचे अंतिम महसूल संकलन लक्षणीयरीत्या कमी होते आणि मार्च 2021 च्या 4 जी लिलावात मिळालेल्या 77,814 कोटी रुपयांपेक्षाही कमी होते.
दोन कंपन्यांकडे 5 जी
सध्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोन पंपन्यांनी हिंदुस्थानातील आपल्या युजर्ससाठी 5जी सेवा सुरु केलेली आहे. आगामी काळात अन्य पंपन्याही 5जी सेवा सुरू करतील.
यंदा कमी प्रतिसाद
– यावेळच्या 5 जी स्पेक्ट्रम लिलावाला कमी प्रतिसाद मिळाला. सरकारला स्पेक्ट्रम विक्रीतून 96 हजार 238 कोटी रुपये मिळवण्याचा अंदाज होता. मात्र एकूण कमाई 12 टक्क्यांपेक्षाही कमी झाली. एकूण 11340 कोटी रुपये स्पेक्ट्रम लिलावातून मिळाले.
– 2022 साली झालेला 5जी स्पेक्ट्रम लिलाव सात दिवस चालला होता. त्यामध्ये दीड लाख कोटींची बोली लावण्यात आली होती. तेव्हा बोली लावणाऱयांमध्ये मुकेश अंबानी अक्वल होते. त्यांनी 88, 078 कोटीची खरेदी केली होती.
– काही तज्ञांनी यावर्षी स्पेक्ट्रमला कमी मागणी असेल असा अंदाज व्यक्त केलेला होता. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष
(संशोधन) बालाजी सुब्रमण्यम म्हणाले होते की, भारती एअरटेल आणि वोडाफोन आपल्या मुदत संपलेल्या स्पेक्ट्रमची खरेदी करतील. सुब्रमण्यम यांनी 12 ते 13 हजार कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रम विक्रीचा अंदाज वर्तवला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List