Liquor Policy Case : केजरीवाल 3 दिवस सीबीआय कोठडीत
दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू जिल्हा न्यायालयाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी दिली. सीबीआयने केजरीवाल यांची मंगळवारी चौकशी केली आणि आज सकाळी अटक करून त्यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर केले. यावेळी सीबीआय आणि केजरीवाल यांच्यात खडाजंगी झाली.
केजरीवाल यांनी मद्यधोरण घोटाळ्यात मनिष सिसोदीया हे दोषी असल्याचा जबाब दिल्याचा दावा सीबीआयच्या वकीलांनी केला. यावर केजरीवाल यांनी त्यांना मध्येच थांबवत मी असा कुठलाही जबाब दिलेला नाही. न्यायालय मी दिलेले जबाब वाचू शकते. माझ्याविरोधात प्रसारमाध्यमांमध्ये सीबीआयकडून खोटया बातम्या पसरवत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. त्यानंतर न्यायमूर्तींनी केजरीवाल यांचे जबाब वाचले आणि त्यांनी अशाप्रकारचा कोणताही जबाब दिलेला नसल्याचे स्पष्ट केले.
काय म्हणाले केजरीवाल?
मनीष सिसोदीया किंवा अन्य कुणी व्यक्ती दोषी आहे असे मी कधीही कुठल्याही जबाबात म्हटलेले नाही. उलट मनीष सिसोदीया, आप, मी निर्दोष आहेत असेच मी सांगत आलो आहे. सीबीआय माझ्याबद्दल खोटया बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरवत आहेत, हे न्यायालयाने रेकॉर्डवर घ्यावे, अशी विनंती केजरीवाल यांनी न्यायालयाला केली.
केजरीवालांनी काय बाजू मांडली?
न्यायमूर्ती अमिताभ रावत यांच्यासमोर सुनावणी झाली. केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी यांनी बाजू मांडली. 20 जून रोजी कनिष्ठ न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. मग आता सीबीआयला केजरीवाल यांची गरज का आहे? जर त्यांच्याकडे केजरीवाल यांच्याविरोधात पुरावे होते तर मग त्यांनी आधीच केजरीवाल यांना का अटक केली नाही, असा सवाल केजरीवाल यांच्या वकीलांनी केला.
सीबीआय काय म्हणाली?
केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीसाठी अंतरिम जामीन देण्यात आला होता. जर त्यांना यादरम्यान अटक केली असती तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ठरला असता त्यामुळे त्यांना अटक केली नाही, असे सीबीआयच्या वकीलांनी सांगितले. केजरीवाल यांची अधिक चौकशी करण्याची गरज आहे, असे सांगत सीबीआयने त्यांची 5 दिवसांची कोठडी मागितली.
केजरीवाल यांची तब्येत बिघडली
सुनावणीदरम्यान उकाडा आणि प्रचंड गर्दी यामुळे केजरीवाल यांची तब्येत बिघडली. रक्तातील साखर कमी झाल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दुस्रया खोलीत न्यायाला आणि काहीतरी खायला देण्याचे निर्देश दिले. काही वेळानंतर पुन्हा सुनावणी सुरु झाली. दरम्यान, सीबीआयने मंगळवारी केजरीवाल यांची तिहार जेलमध्ये जवळपास दीड तास चौकशी केली आणि त्यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर आज सकाळी त्यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात सादर करण्यात आले.
केजरीवाल तुरुंगातून बाहेर येऊ नये म्हणून यंत्रणा प्रयत्नशील- सुनीता केजरीवाल
अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर येऊ नयेत यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नशील आहे. हे सर्व हुकूमशाही आणि आणीबाणीसारखे आहे, असा आरोप केजरीवाल यांची पत्नी सुनिता केजरीवाल यांनी केला आहे. सुनीता केजरीवाल यांनी एक्सवरून केलेल्या पोस्टमधून केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. केजरीवाल यांना जामीन मिळाला होता. परंतु, ईडीने तातडीने स्थगिती आदेश काढला. तर दुस्रयाच दिवशी केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली, याकडे सुनीता केजरीवाल यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळण्याची शक्यता असल्याने भाजप अस्वस्थ झाला. त्यामुळे त्यांच्यावर बनावट गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आपने केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List