विधान परिषद निवडणूक, 56 टक्के पदवीधर तर 75 टक्के शिक्षकांनी बजावला मतदानाचा हक्क
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. मुंबई पदवीधर मतदारसंघात एकूण 56 टक्के तर मुंबई शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक 75 टक्के मतदान झाले.
मुंबई पदवीधर मतदारसंघात सायंकाळी 6 वाजता मतदान संपले तेव्हा एकूण 56 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी 1 वाजेपर्यंत 46 हजार 375 म्हणजेच 38.39 टक्के मतदान झाले होते.
मुंबई शिक्षक मतदारसंघात एकूण 15,839 मतदार आहेत. दिवसभरात तिथे 75 टक्के मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच मतदानाचा आकडा 73.4 टक्क्यांवर पोहोचला होता.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण मतदार 69 हजार 368 इतके आहेत. तिथे एकूण 93.48 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
कोकण पदवीधरमध्ये 63 टक्के मतदान
कोकण पदवीधर मतदारसंघात 2 लाख 23 हजार 408 मतदार आहेत. दुपारी 6 वाजेपर्यंत तिथे 63 टक्के मतदान झाले. एकटय़ा सिंधुदुर्ग जिह्यात 80.1 टक्के मतदान झाले. तेथील 18551 मतदारांपैकी 14858 मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीमध्ये एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र मुख्य लढत काँग्रेसचे रमेश कीर आणि भाजपचे निरंजन डावखरे यांच्यात होती. ही निवडणूक सर्वत्र शांततेत पार पडली. मोखाडामध्ये मात्र महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.
मतदान केंद्रात अनोळखी व्यक्तीची घुसखोरी; शिवसैनिकांनी दाखवला हिसका
पदवीधर आणि शिक्षक मतदानाच्या दिवशी मलबार हिल विधानसभेतील एका बूथवर दडपशाही दिसून आली. मतदान नसलेला एक व्यक्ती अन्य एका मतदारासोबत मतदान केंद्रात मोबाईल फोन घेऊन गेला होता. बाहेर येताच शिवसैनिकांनी त्याला पोलीस अधिकाऱयांच्या समोरच पकडले. शिवसेना विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी ही व्यक्ती मोबाईल घेऊन मतदान पेंद्रात गेलीच कशी, असा जाब पोलिसांना विचारला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पोलिसांबरोबर शिवसैनिकांची जोरदार बाचाबाची झाली.
1 जुलैला निकाल
मुंबई पदवीधर मतदारसंघातून सलग पाच वेळा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. या वेळी या मतदारसंघातून शिवसेनेचे अॅड. अनिल परब हे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर भाजपने किरण शेलार यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात शिवसेनेचे ज.मो. अभ्यंकर, अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, भाजपचे शिवनाथ दराडे, मिंधे गट पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे असे पाच प्रमुख उमेदवार आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघातून 21 उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत शिवसेनेचे संदीप गुळवे, मिंधे गटाचे किशोर दराडे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List