प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श झालेल्या बाणगंगेची विटंबना! मिंध्यांच्या कंत्राटदाराचा घाव, पायऱ्यांची तोडफोड, रहिवाशांचा प्रखर विरोध, काम बंद पाडले
वाळकेश्वर येथील पुरातन वारसा वास्तू आणि प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र बाणगंगा तलावाची मिंधे सरकारने नेमलेल्या कंत्राटदाराने विटंबना केली आहे. तलावातील गाळ काढण्यासाठी जेसीबी चालवणाऱ्या कर्मचाऱ्याने थेट तलावाच्या दगडी पायऱ्यांवर जेसीबी घुसवला. जेसीबी तलावात जाण्यासाठी तलावाच्या पायऱ्या जेसीबीने उचकटवून त्याची तोडफोड केली. पवित्र, धार्मिक स्थळावरील तोडफोडीचा प्रकार बघून स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे एकवटत काम बंद पाडले. दरम्यान, निष्काळजीपणे वारसा वास्तूला हानी पोहोचवल्याबद्दल महापालिकेने मलबार हिल पोलीस ठाण्यात कंत्राटदार सवानी हेरिटेज कन्झर्वेशन कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई महापालिकेच्या वतीने प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुरातन बाणगंगा तलावाचे वाराणसीच्या धर्तीवर पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. महापालिकेचा हा विशेष प्राधान्य प्रकल्प असून निविदा काढल्यानंतर पुरातन वास्तूंची कामे करणाऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत तलावाभोवती भक्ती परिक्रमा, तलावाचे खोलीकरण, परिसरातील बेकायदा बांधकामे हटवणे, तलावाच्या भितींवर भित्तिचित्रे, परिसरात आकर्षक रोषणाई, भाविकांसाठी सुविधा, पार्किंग आणि पाण्याच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी पालिका 15 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. सध्या तलाव परिसरातील ऐतिहासिक 16 दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन करण्यात येत असून तलावातील दगडी पायऱ्यांची दुरुस्ती व सुधारणा, तलावाच्या सभोवती असणारा वर्तुळाकार रस्ता ‘भक्ती परिक्रमा मार्ग’ म्हणून विकसित करणे, मंजूर रस्ता रेषा असलेली 18.30 मीटर रुंद अशी बाणगंगा तलावाकडे जाणारी ‘मिसिंग लिंक’ विकसित करणे, तलावाच्या दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटवणे अशी कामे करण्यात येणार आहेत.
पुरातन विभागाने वारसा स्थळ जतन करण्याच्या अनुषंगाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचा भंग कंत्राटदाराने केला आहे. महापालिकेच्या वतीने नुकसान झालेल्या पायऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
असे आहे तलावाचे महत्त्व
महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, 1960 अन्वये बाणगंगा तलाव महाराष्ट्र शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या तलावाभोवती मंदिरे, समाधी, धर्मशाळा, मठ असून हे स्थान राष्ट्रीय महत्त्व असलेले सांस्कृतिक केंद्र आहे. तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, राम मंदिर, बजरंग आखाडा, वाळुकेश्वर मंदिर इत्यादी प्रसिद्ध मंदिरे आहेत.
प्रभू श्रीरामाचा वास असलेली प्रत्येक जागा गमावल्याने भाजपने हा सूड उगवला आहे का?
बाणगंगेच्या पायऱ्यांची नासधूस केल्याप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा भाजप, मिंधे सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया ‘एक्स’वर त्यांनी संताप व्यक्त करत भाजप आणि मिंधे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ते म्हणाले, हे धक्कादायक असून संबंधित कंत्राटदाराला सरकारने ताबडतोब अटक केली पाहिजे. प्रभू श्रीरामाचा वास असलेली प्रत्येक जागा गमावल्याने भाजपने हा सूड उगवला आहे का? अयोध्या मंदिराच्या (राजकीय फायद्यासाठी घाईघाईत उद्घाटन झाले) छताला गळती आहे, ड्रेनेजची व्यवस्था नाही आणि आता हे सत्ताधारी व त्यांचे कंत्राटदार बाणगंगा तलावाचेही नुकसान करत आहेत.
मुंबई महापालिकडून तलावातील गाळ काढण्यासाठी पारंपरिक पद्धत वापरली जाते. मात्र या विशेष प्रकल्पांतर्गत नेमलेल्या कंत्राटदाराने पहिल्यांदाच जेसीबीचा वापर केला. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List