इंडियाच्या आक्रमणाशी एनडीएचा सामना; लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी राहुल गांधी
लोकसभा निवडणुकीत मोदी-शहांच्या हुकूमशाही कारभाराला जोरदार दणका देत मोठे यश मिळवल्यानंतर आता संसदेत जनतेचा आवाज बनून एनडीए सरकारवर आक्रमण करण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज झाली आहे. या लढय़ाचे नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधी करणार आहेत. लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींच्या नावावर इंडिया आघाडीकडून आज शिक्कामोर्तब करण्यात आले असून हा प्रस्ताव लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे उद्या लोकसभेत इंडिया विरुद्ध एनडीए असा पहिला अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. यानंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे, अशी माहिती के. सी. वेणुगोपाल यांनी बैठकीनंतर माध्यमांना दिली.
मोदींचा हेतू स्पष्ट नाही
एकीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात की सर्वानुमते निर्णय व्हायला हवा. त्यानंतर आमच्या नेत्याचा अपमान केला जातोय. त्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट नाही. उपसभापतीपद विरोधकांना द्यायचे ही प्रथा आहे. प्रथा आहे की उपाध्यक्ष हा विरोधकांमधील असायला हवा. जर प्रथा पाळली गेली तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पूर्ण समर्थन देऊ. नरेंद्र मोदी बोलतात एक आणि करतात एक. पण यांना हे सगळं बदलावे लागणार आहे, असे राहुल म्हणाले.
काँग्रेस-भाजपकडून खासदारांना व्हीप
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी केला आहे. काँग्रेसने खासदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, उद्या लोकसभेत एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जाईल. लोकसभेतील काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की, सकाळी 11 वाजल्यापासून सभागृह तहकूब होईपर्यंत सभागृहात उपस्थित राहावे. भाजपनेही आपल्या खासदारांना व्हीप काढला आहे.
आज पहिली अग्निपरीक्षा
लोकसभेत भाजपला मिळालेल्या मर्यादित यशामुळे मित्र पक्षांच्या पाठिंब्याबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. मागच्या दहा वर्षात भाजपकडे पूर्ण बहुमत असल्याने अध्यक्षांची निवड करताना त्यांना कुणाच्या पाठिंब्याची गरज भासली नाही. पण, या लोकसभेत भाजपकडे पूर्ण बहुमत नसल्याने लोकसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यासाठी विरोधातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांशी सर्व सहमतीबाबत चर्चा केली. केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी याबाबत चर्चा केली. संसदीय परंपरेप्रमाणे लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधकांना देण्यात यावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. पण, सत्ताधाऱ्यांकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे इंडिया आघाडीने अखेर अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व काँग्रेसचे के. सुरेश यांना उमेदवारी दिली. लोकसभेतील संख्याबळावर नजर टाकल्यास तूर्त एनडीएचं पारडं जड दिसत आहे. मात्र, या निमित्तानं इंडिया आघाडीला आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली आहे.
72 वर्षात तिसऱ्यांदाच होणार निवडणूक
स्वतंत्र भारताचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहता 72 वर्षात तिसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. याआधी फक्त दोन वेळा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली आहे. त्यात सर्वात पहिली 1952 आणि त्यानंतर आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत 1976 मध्ये अशाच प्रकारे अध्यक्षपदावर सहमती न झाल्यामुळे निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर आता थेट 2024 मध्ये लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून निवड होणारे गांधी घराण्यातील तिसरे सदस्य ठरणार आहेत. यापूर्वी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी हे पद भूषवले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी, यासंदर्भातील ठराव पारीत करण्यात आला होता.
लोकसभा अध्यक्षांची आज निवड
लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आहे. अध्यक्ष पदासाठी भाजपचे ओम बिर्ला यांच्या विरुद्ध काँग्रेसचे के. सुरेश असा सामना उद्या लोकसभेत पहायला मिळणार आहे.
मणिपूरचा आवाज सभागृहात घुमला
मणिपूरमधील काँग्रेस खासदार अप्रेड आर्थर यांचे नाव शपथ घेण्यासाठी पुकारले जाताच विरोधी बाकांकरून मणिपूर, मणिपूर अशा घोषणा देण्यात आल्या. शपथ घेतल्यानंतर अप्रेड यांनी मणिपूरला न्याय द्या आणि देश वाचवा, असे ठणकावून सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List