आहात कुठे? पालगडात 3 खंडी भात शेतीच्या लावणीची मालवणीही झाली
पाऊस उशीराने सुरू झाला त्यामुळे अजून काही ठिकाणी भाताचे रोप लावणीयोग्य झालेलेही नाही अशातच पालगड येथील एका शेतक-यांने तब्बल 3 खंडीच्या शेतीची भात लावणी पूर्ण केली आहे.
कोकणातील भातशेती ही मोसमी पावसावर अवलंबून असणारी शेती आहे. बेभरवशी मोसमी पाऊस पडायला सुरूवात झाली की तो शेतीचे कामही करू देत नाही तेव्हा तो पाऊस शेतक-यांना नकोसा होतो तर याउलट जेव्हा पाऊस कोसळत नाही तेव्हा मात्र शेतक-याचे डोळे हे कधी एकदा पाऊस पडेल आणि शेतीची कामे पूर्ण होतील याकडे लागतात. हे दोन्ही प्रकार पाहता शेतीची कामे खोळंबून राहतात. मात्र काही चाणाक्ष शेतकरी असतात ते रोहणी नक्षत्राच्या मुहुर्तावर धानाची मुठ सोडतात. अशा धोरणी शेतक-यांना हे चांगलेच माहीत असते की, पेरलेले धान वांझ जाणार नाही. एकाद दुस-या रिमझिम बरसणा-या पावसाच्या सरीने अथवा दव बिंदुंच्या दमाने शेतात पेरलेल्या धान्याला कोंब फुटणारच आणि एकदा का ? रोप वर आले तर निसर्ग देवता ही त्या रोपाला मारणार नाही. अगदी त्याच धोरणाने पालगड या सुप्रसिध्द गावातील पवारवाडीत राहणारे दत्ताराम महादेव पाटणे या शेतक-यांने रोहीणी नक्षत्र निघताच संकष्ट चतुर्थीच्या शुभ मुहुर्तावर 26 मे रोजी त्यानंतर 27 मे रोजी धान्याची पेरणी केली 22 जूनला बरोबर 28 दिवसांनी भात रोपांची लावणी सुरू केली आणि 3 खंडी भात पिकाची लावणी 24 जूनला 3 दिवसात पूर्णही केली. असा हा अवलिया शेतकरी केवळ कृषी क्षेत्रातच पारंगत आहे असे नाही तर तो व्यवसाय तसेच सामाजिक कामातलाही एक यशस्वी कलाकार आहे.
दापोली तालूक्यातील पालगड या गावाची ओळख ही ऐतिहासिक पालगड किल्ल्यामुळे तर आहेच शिवाय पांडूरंग सदाशिव उर्फ साने गुरूजी त्यानंतर तत्कालीन मंत्री कै. रामचंद्र तथा बाबुराव बेलोसे यांचे गाव म्हणून सर्व परिचित असे पालगड गाव आहे. अशा या गावातील पवार वाडीत राहणा-या आणि जूने 11 वीचे शिक्षण घेतलेल्या दत्ताराम महादेव पाटणे या 63 वर्षीय शेतक-यांने 3 एकर स्व मालकीच्या भात शेत जमिनीतील दोन मोठया आणि आकारमानाने दोन लहान भात शेतीच्या चोंडयांमध्ये कर्जत 2 या भाताची लागवड केली आहे. शेताची नांगरट पाॅवर टिलरने केली आहे. घरातील 3 माणसांसह साधारणपणे शेती कामासाठी स्त्री पुरूष मिळून एकुण 20 माणसे शेतीच्या कामाला 3 दिवस लागली. दत्ताराम पाटणे म्हणतात भात शेती करणे म्हणजे खर्चापेक्षा उत्पन्न कमी मिळणारी तोटयातील शेती मात्र आपली स्वतःची शेती करण्यात एक वेगळेच मनाला समाधान देवून जाते शेती करणे सोडू नये शेतीचे निट नियोजन केले तर तोटया ऐवजी फायदयाची शेती होते.
दत्ताराम पाटणे हे उत्तम शेती करतातच शिवाय ते एक कापड व्यवसायिकही आहेत. पालगड येथील विविध सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत. पालगड ग्राम पंचायतीचे ते तंटामुक्त अध्यक्षही राहीलेले आहेत शिवाय अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद शाखा दापोलीचे ते सचिव म्हणून कार्यरत आहेत. अशा या सर्व व्यस्त कामातून त्यांनी दापोली तालूक्यात सर्वांत आधी भात शेतीची लावणी पूर्ण करण्याचा तालूक्यात या वर्षीच्या खरीप हंगामात पहिला मान पटकावला हे मात्र त्यांचे विशेषच आहे.
फोटो कॅप्शन – दापोली तालूक्यातील पालगड पवारवाडी येथील दत्ताराम पाटणे हे आपल्या शेतात पत्नी दिपाली मुलगा निलेश पाटणे यांचेसह भात शेतीची लावणी करताना
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List