लोकसभेत विरोधक आक्रमक… पहिल्याच दिवशी सरकारची दाणादाण! मोदी शपथ घेताना राहुल गांधी यांनी संविधान झळकावले
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर होत असलेल्या संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात संविधान रक्षणाच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सदस्यत्वाची शपथ घेत असताना त्यांना हात उंचावून संविधानाची प्रत दाखवली. मोदींची शपथ पूर्ण होईपर्यंत विरोधी पक्षांचे खासदारही त्यांना संविधानाची प्रत दाखवत होते. संसदेबाहेरही इंडिया आघाडीच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली. संविधान टिकविण्यासाठी इंडिया आघाडी पहारेकरी बनून उभी ठाकल्याचेच आज दिसले.
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपने घटक पक्षांच्या टेकूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात एनडीएचे सरकार स्थापन केले आहे. या सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांच्या नियुक्तीला इंडिया आघाडीच्या खासदारांनी जोरदार विरोध केला. संसद संकुलातील महात्मा गांधी यांच्या पुतळय़ासमोर कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील खासदारांनी लोकशाही आणि संविधान वाचवा अशी घोषणाबाजी करत संविधानाची प्रत फडकवत आंदोलन केले. हंगामी अध्यक्षाच्या पॅनेलवर बहिष्कार घालत विरोधकांनी आज सरकारला पहिला झटका दिला.
तुम्ही विरोधकांना 50 वर्ष जुन्या आणीबाणीची आठवण करून देत आहात. पण गेल्या 10 वर्षातील अघोषित आणीबाणी विसरलात जी जनतेने संपवली आहे. मोदींच्या विरोधात जनधार असूनही ते पंतप्रधान झाले असतील तर त्यांनी काम करावे. लोकांना घोषणा नकोत, जगण्यासाठी अन्न हवे हे लक्षात ठेवा. इंडिया आघाडीला संसदेत एकमत हवे आहे. आम्ही संसदेत आणि संसदेबाहेर जनतेचा आवाज बुलंद करत राहू. आम्ही संविधानाचे रक्षण करू, लोकशाही झिंदाबाद, असे खरगे यांनी म्हटले आहे.
जे. पी. नड्डा राज्यसभा सभागृह नेते
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची राज्यसभेच्या सभागृहनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पीयुष गोयल हे याआधी राज्यसभेचे सभागृहनेते होते.
देश चालवण्यासाठी एकमत गरजेचे – नरेंद्र मोदी
सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे; परंतु देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी 25 जून हा अविस्मरणीय दिवस आहे. या दिवशी देशाच्या लोकशाहीला काळिमा फासला गेला आणि त्याला 50 वर्षे पूर्ण झाली. 50 वर्षांपूर्वी जे केले होते ते हिंदुस्थानात पुन्हा कुणी करण्याची हिंमत करू नये असा संकल्प आहे, असेही मोदी म्हणाले.
रस्सी जल गई, पर बल नहीं गया – मल्लिकार्जुन खरगे
आणीबाणीच्या मुद्दय़ावरून विरोधकांना टीकेचे लक्ष्य करणाऱ्या पंतप्रधान मोदींना कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींनी त्यांच्या भाषणात नेहमीचे शब्द गरजेपेक्षा अधिक वापरले, रस्सी जल गई, पर बल नही गया असा टोला सोशल मीडियावर एक पोस्ट करत लगावला आहे. दरम्यान, देशातले सरकार कुबडय़ांवर आहे, तर त्यांच्यासमोर मजबूत विरोधी पक्ष उभा आहे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला म्हणाले.
हंगामी अध्यक्षांच्या पॅनलवर विरोधी सदस्यांचा बहिष्कार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काँग्रेसचे के. सुरेश, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय आणि डीएमकेचे टी.आर. बालू या तिघांचा लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांच्या पॅनलमध्ये समावेश केला; परंतु विरोधी पक्षाचे सदस्य असणाऱ्या या तिघांनीही या पॅनलवर बहिष्कार घातला. नवीन खासदारांना शपथ देण्याच्या कामात प्रोटेम स्पीकरला मदत न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
हंगामी अध्यक्षांच्या नियुक्तीविरुद्ध संविधान हातात घेऊन खासदारांचे संसदेबाहेर आंदोलन
हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांच्या नियुक्तीला इंडिया आघाडीच्या खासदारांनी जोरदार विरोध केला. संसद संकुलातील महात्मा गांधी यांच्या पुतळय़ासमोर कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील खासदारांनी लोकशाही आणि संविधान वाचवा अशी घोषणाबाजी करत संविधानाची प्रत फडकवत आंदोलन केले.
नीट नीट… शेम शेम…शिक्षणमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी
नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. नीटमधील गोंधळावरून आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान शपथ घेण्यासाठी उठताच ‘नीट नीट’ अशी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.
मोदी-शहा संविधानावर आक्रमण करतायतः राहुल गांधी
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा हे दोघे देशाच्या संविधानावर आक्रमण करत आहेत. आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही. राज्यघटनेला कोणतीही शक्ती हात लावू शकत नाही. आम्ही संविधानाचे रक्षण करू, असे राहुल गांधी म्हणाले.
मोदी सरकारचे 15 दिवसांत 8 कारनामे
मोदी सरकारने 15 दिवसांत केलेले 8 कारनामे काँग्रेसने एक्सद्वारे जनतेसमोर ठेवले आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर जलपाईगुडी येथे झालेली भीषण ट्रेन दुर्घटना, महागाई गगनाला भिडली, दूध, डाळ, भाजीपाला, गॅस, टोल महागला, रुपया गडगडला, नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले गेले, नीट-पीजी रद्द झाली, जम्मू-कश्मीरमध्ये भयंकर दहशतवादी हल्ले झाले, रुपया गडगडला… अशी कारनाम्यांची मालिकाच काँग्रेसने उघड केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List