गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी
भंडारा येथील गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आश्वासन दिले होते, त्या आश्वासनांचे काय झाले? असा सवाल आज प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना केला आणि भर सभेत घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. विविध मागण्यांप्रकरणी मुख्यमंत्री सातत्याने दुर्लक्ष करत असून त्यांनी अद्याप आपले म्हणणे ऐकून घेतलेले नाही, भेटही घेतली नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला.
आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे ऐकून घेण्याऐवजी पोलिसांनी जोरजबरदस्ती करत आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्तांना पोलीस व्हॅनमध्ये अक्षरशः कोंबून नेले. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांविरोधात संतापाची लाट उसळली असून भंडारा येथील प्रकल्पग्रस्त आणखी तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
फलकावरून देवेंद्र फडणवीस यांचे नाव गायब
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि जलसंपदा विभागाच्या वतीने संयुक्तरित्या गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये महत्त्वाकांक्षी अशा जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासाठी लावलेल्या फलकावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव गायब असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत होते. विशेष म्हणजे पालकमंत्री म्हणून विजयकुमार गावित, उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत यांचे तर या परिसरातील लोकप्रतिनिधी म्हणून प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, प्रशांत पडोळे आणि अनेक आमदारांचे नाव फलकावर नव्हते. मात्र वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प जिह्याच्या फलकावर फडणवीस जलसंपदा मंत्री असताना त्यांचे नाव नव्हते. याबद्दल प्रचंड आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे दरम्यान, फडणवीस यांचे नाव टाकायला महायुती विसरली का, असा सवालही उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे जलसंपदा विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव आणि पर्यटन विभागाचे सचिव यांचेही नाव फलकावर होते.
पत्रकारांची बोट बुडाली; सर्व सुरक्षित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जल पर्यटनासाठी एका बोटीतून तर माध्यम प्रतिनिधी दुसऱ्या बोटीतून जात होते. या वेळी एका स्पॉटचे फुटेज घेण्यासाठी सर्व जण एका बाजूला झाल्यामुळे बोट पलटी झाली. बोटीत पाणी शिरले. सुदैवाने आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांची बोट सोबत होती. त्यांनी प्रसंगावधान दाखवत सर्व पत्रकारांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, बोटीतील सर्व पत्रकार आणि बोटचालक सुरक्षित असल्याची माहिती भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतांनी दिली.
काळे झेंडे दाखवले
जागतिक जल पर्यटन प्रकल्पाचा भूमिपूजन कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांचा ताफा सभा स्थळाकडे जात असताना युवक काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात हे काळे झेंडे दाखवण्यात आले. यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्यासह काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List