नॉनस्टॉप सत्ता, सलग सात सामने जिंकत वर्ल्ड कपमध्ये केला नवा विक्रम
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सलग सात सामने कुणीही जिंकला नव्हता आणि तोच विक्रम दक्षिण आफ्रिकेने रचण्याचा पराक्रम केलाय. त्यांनी आज यजमान वेस्ट इंडीजचा पराभव करताना या वर्ल्ड कपमध्ये आपलीच सत्ता असल्याचे पुन्हा दाखवले. गेल्या आठही स्पर्धांत एकाही संघाला व जगज्जेत्याला सलग सात सामने जिंकता आले नव्हते. दक्षिण आफ्रिकेने तो विक्रम आता बदलून दाखवलाय.
वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आयपीएल गाजवल्यामुळे अंतिम चार संघांत त्यांचेही नाव होते आणि त्यांनी ते खरे करून दाखवले. आफ्रिकेने आपल्या सलामीच्याच सामन्यात श्रीलंकेचा 77 धावांत खुर्दा पाडत दणदणीत सुरुवात केली होती. त्यानंतर झालेल्या तिन्ही सामन्यांत त्यांना संघर्ष करत जिंकावे लागले. नेदरलॅण्ड्सविरुद्ध ते सात चेंडू आधी जिंकले. बांगलादेश तर जिंकता जिंकता अवघ्या 4 धावांनी हरला आणि सर्वात शेवटी नेपाळचा ऐतिहासिक विजय अवघ्या एका धावेने हुकला.
एक श्रीलंका सोडली तर साखळीतील तिन्ही लढती थरारक झाल्या आणि दक्षिण आफ्रिकेला निसटता विजय मिळाला; पण गुणतालिकेत चारही साखळी सामने जिंकत ते अव्वल स्थानावर राहिले होते. मग सुपर एटमध्ये दक्षिण आफ्रिकेने आपल्या विजयाचा सिलसिला कायम राखण्याची किमया केली. अमेरिकेला हरवले. इंग्लंडविरुद्धही केवळ सात धावांनी विजय मिळाला. शेवटचा सुपर एट साखळी सामनाही थरारक झाला. यातही दक्षिण आफ्रिकेने 5 चेंडू राखून विजय नोंदविला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकाही सामन्यात मोठा विजय न मिळवू शकलेला दक्षिण आफ्रिका हा एकमेव संघ असला तरी ते नॉनस्टॉप आहेत.
वर्ल्ड कपच्या इतिहासात आजवर केवळ सहा सामने सलग जिंकले गेले होते. दक्षिण आफ्रिकेने तो आकडा आता सात केला आहे. त्याचबरोबर ते तब्बल एका दशकानंतर ते उपांत्य फेरीत पोहोचलेत. 2014 नंतर ते एकदाही उपांत्य फेरीत धडक मारू शकले नव्हते. त्याचप्रमाणे आजवर त्यांच्यावर चोकर्सचाच शिक्का मारला जात आहे. यावेळचा खेळ पाहता ते हा शिक्का पुसतील अशी आशा बाळगायला हरकत नसावी. त्यांची फलंदाजी त्यांची ताकद असली तरी ते वर्ल्ड कपमध्ये खुलून खेळली गेलीय असे अद्याप झालेले नाही. त्यांचा संघ निव्वळ सांघिक कामगिरीवर जिंकतोय. त्याच जोरावर त्यांचा संघ अपेक्षेप्रमाणे उपांत्य फेरीत पोहोचलाय. आता त्यांची उपांत्य लढत हिंदुस्थान किंवा ऑस्ट्रेलियाशी पडेल. ते उद्या स्पष्ट होईलच. पण दक्षिण आफ्रिकेच्या नॉनस्टॉप विजयाची मालिका आणखी किती सामने धावतेय ते पाहणे थरारक असेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List