बंगल्याची खोटी जाहिरात करून फसवाफसवी; भामटय़ाला अटक
लोणावळा येथे प्रशस्त बंगला भाडय़ाने मिळेल अशी इन्स्टाग्रामवर खोटी जाहिरात करून नागरिकांची फसवणूक करणाऱया एका भामटय़ाला मलबार हिल पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. त्या आरोपीविरोधात अशाप्रकारचे गुन्हे केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
दिनकर (नाव बदलले) यांनी इन्स्टाग्रामवर ‘हेरिटेज-स्टे’ या खात्यावर व्हिला भाडय़ाने मिळेल अशी जाहिरात वाचली होती. त्या जाहिरातीवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून दिनकर यांनी व्हिला भाडय़ाने पाहिजे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना नाश्ता, जेवणासह एका रात्रीचे 35 हजार भाडे सांगण्यात आले. दरम्यान, व्हिलाचा पत्ता समोरच्याने दिल्यानंतर दिनकर यांनी आरोपींच्या बँक खात्यावर पैसे टाकले. त्यानंतर वाटेल ती कारणे सांगून तुमची बुकिंग रद्द करावी लागत असल्याचे त्याने सांगितले. तेव्हा समोरच्याने दिनकर यांना दोन हजार रुपये पाठवले व उर्वरित रक्कम लवकरच देऊ असे सांगत टाळले. याविरोधात दिनकर यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून उपनिरीक्षक संदीप शिंदे, किरसेन पाटील तसेच धारवाडकर, कदम, संदे पथकाने तपास सुरू केला तेव्हा नागरिकांना ऑनलाइन चुना लावणारा भामटा आकाश जाधवानी हा असून तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पुणे गाठून त्याला पकडून आणले.
दोघा भावांचा फसवाफसवीचा धंदा
याआधी आकाश आणि त्याचा भाऊ अविनाश जाधवानी या दोघा भावांना मलबार हिल पोलिसांनी वर्ष 2021 मध्ये अशाच गुन्हात पकडले होते. त्यानंतरही आरोपींनी फसवाफसवीचा धंदा सुरूच ठेवला. या भावांविरोधात मलबार हिल वगळता व्हिप रोड, डी. बी मार्ग, कुलाबा, नया नगर आदी पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल आहे. आकाशला आता पकडण्यात आले असून अविनाश महिनाभरापासून तुरुंगात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List