आगामी निवडणुकीत उमेदवारांना पिपाणी चिन्ह देऊ नका, राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
तुतारी वाजवणारा माणूस ही राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक निशाणी आहे, परंतु लोकसभा निवडणुकीत ही तुतारी आणि पिपाणी या चिन्हांमध्ये गफलत झाल्याने राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला पिपाणी चिन्ह देऊ नये अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक आयोगाकडे केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणूक तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढवली. रामकृष्ण हरी-वाजवा तुतारी ही राष्ट्रवादीची घोषणा राज्यभर गाजली, परंतु काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या पिपाणी चिन्हाने राष्ट्रवादीच्या उमेदवारांची लाखो मते गफलतीने अपक्षांच्या पारडय़ात पडली. आगामी निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी चिन्हांमध्ये मतदारांचा गोंधळ होऊ नये म्हणून पिपाणी चिन्ह कुणालाही देऊ नये अशी विनंती राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला केली.
सातारा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला ‘पिपाणी’ चिन्हामुळे फटका बसला. सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा 32 हजार 771 मतांनी पराभव झाला. तेथील तिसऱया क्रमांकाच्या पिपाणी चिन्हवाल्या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या भास्कर भगरे यांनी भाजपच्या डॉ. भारती पवार यांचा 1 लाख 13 हजार 199 मतांनी पराभव केला तर पिपाणी चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांनी तब्बल 1 लाख 3 हजार 632 मते घेतली आहेत. बारामती, शिरुर, माढा, भिवंडी, रावेर, वर्धा या मतदारसंघांमध्येही अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी घसरल्याचे दिसून आले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List