शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली जास्त परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक; खेड पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
चंडीगढ़ येथून बनावट “ट्रेडिंग ॲप्लिकेशन” व “शेअर मार्केट ट्रेडिंग” करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला खेड पोलीसांनी चंदिगड येथून अटक केली आहे. तक्रारदारांना एआरके लर्निंग ग्रुप या व्हॉटस ॲप ग्रुपवरील ट्रेडींग संदर्भातील मेसेज तसेच 8250733503 आणि 8735938239 या मोबाईल क्रमांकावरून येणाऱ्या व्हॉटस ॲप संदेशद्वारे जास्त परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. एआरके लर्निंग ग्रुप या कंपनीमध्ये पैश्याची गुंतवणूक करून जास्तीत जास्त रकमेचा परतावा देण्यात येईल, असे सांगून तक्रारदारांची 24 लाख 85 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी 3 जून रोजी खेड पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारदरांनी 24 लाख 85 हजार रूपये आरोपीच्या 6 वेगवेगळ्या बँक अकाउंट वर पाठवले होते. ते 6 बँक अकाऊंटबाबत खेड पोलीस तपास पथकाद्वारे अधिक माहिती घेण्यात आली. फिर्यादी यांची अपहरित रक्कम पुढे अन्य 43 बँक अकाऊंट मध्ये वळवण्यात आली होती. त्यानंतर पुढे 22 वेगवेगळ्या अकाउंट मध्ये वळवण्यात आल्याची माहिती मिळाली. या रक्कमेपैकी 4 लाख 50 हजार चंडीगढ़ व जोधपूर येथील एटीएममधून काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, चंडीगढ़ व जोधपूर-राजस्थान या राज्यांमध्ये खेड पोलीस ठाण्याचे एक तपास पथक पाठविण्यात आले.
या तपास पथकाने बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या तपासामध्ये एटीएम मधून पैसे काढणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती घेतली. एकजण व्यसनाधिनतेमुळे इतर व्यक्तीच्या सांगण्यावरून एटीएममधून पैसे काढून त्यांच्या ताब्यात देत असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला व या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नीरज महेंद्र जांगरा (वय 22, सध्या रा. चंडीगढ़, मुळ रा.कुर्दल हरियाणा) याला चंडीगढ़मधून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 25 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हा गुन्हा करताना त्याने अनेकांना शेअर मार्केटच्या नावाखाली जास्त नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून वेग-वेगळ्या फर्मच्या नावाने अनेक बँक खाते उघडून त्यावर अनेकांकडून रक्कम घेत फसवणूक केली असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक, नितीन भोयर,स.पो.नि. संजय चव्हाण,दिपक गोरे, वैभव ओहोळ, रुपेश जोगी, खेड सुमित नवघरे,शिरीष साळुंखे,रमिज शेख,सौरभ कदम यांनी केली.
शेअर ट्रेडिंग ॲपचा वापर करून शेअर मार्केट अथवा ट्रेडिंग करण्यापूर्वी ट्रेडिंग ॲपची सत्यतेबाबत पडताळणी करावी. कमी कालावधीतील जास्त परतव्याच्या आमिषाला बळी पडू नका. टेलिग्राम आणि व्हॉटस ॲपद्वारे प्राप्त लिंकवरून ट्रेडिंग ॲप डाउनलोड करू नका.
– धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List