कळसूबाई शिखरावर गुजरातमधील तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
राज्यातील सर्वाधिक उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर चढाई करताना गुजरातमधील बलसाड येथून पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नेमीन नरेशभाई पटेल (वय 23) असे त्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली.
बलसाड (गुजरात) येथील काही तरुण पर्यटकांचा जथ्था रविवारी कळसूबाई शिखर सर करण्यास आला होता. सर्व मित्रांनी एकत्रितच कळसूबाई शिखर चढाईस सुरुवात केली. रविवारी कळसूबाई शिखर सर करताना नेमीन यास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. हे लक्षात आल्यावर सोबतच्या मित्रांकडून नेमीनच्या छातीवर पंपींग करून तोंडाद्वारे ऑक्सिजन देण्याचे प्रयत्न केले. तसेच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल दिलीप डगळे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गडावरून डोली करून नेमीनला गडाखाली आणण्यात आले. मात्र, त्याचा या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातच मृत्यू झाला. त्यांनी त्याचा मृतदेह पायथ्याशी आणला. राजूर ग्रामीण रुग्णालयातून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्घटनेबद्ददल परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List