शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांची इंडिया बुक मध्ये नोंद, साकारले 62 हजार 500 चौकोनांचे जंबो शब्दकोडे
लिम्का बुक विजेते शब्दकोडेकार प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनी 250 × 250 म्हणजे तब्बल 62 हजार 500 चौकोनांचे कोडे पूर्ण केले असून या कोड्याची दखल इंडिया बुकने घेतली आहे. प्रसन्न कांबळी यांची इंडिया बुक मध्ये नोंद झाली.त्यांनी तयार केलेल्या कोड्यामध्ये 13 हजार 886 आडवे शब्द आणि 13 हजार 845 उभे शब्द आहेत. हे शब्दकोडे बनवायला त्यांना सुमारे चार वर्षे लागली. कांबळी यांची कोडी दोन वेळा इंडिया बुकमध्ये नोंदवली गेली आहेत. हा एक विक्रम म्हणावा लागले. लिम्का बुकमध्ये एकदा व इंडिया बुकमध्ये दोनदा असा तीन वेळा राष्ट्रीय विक्रम केला आहे. आता एशिया बुकसाठी त्यांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत.
दहा हजार चौकोनांचे शब्दकोडे, दहा हजार शब्दकोडी असे विक्रम कांबळी यांच्या नावावर आहेत. सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या प्रवासाविषयी माहिती दिली. प्रसन्न कांबळी गेली तीस वर्षे शब्दकोडी तयार करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी सर्व दैनिके आणि साप्ताहिकांमधून त्यांची शब्दकोडी प्रकाशित झाली आहेत. विशिष्ट विषयावर कोडे, पाच मिनिटांत कोडे, एकाला एक जोडून महाशब्दकोडे होईल, अशी अनेक कोडी त्यांनी रचली आहेत. ते म्हणाले, एकूण दहा हजार शब्दकोडी पूर्ण झाली आहेत. 250 चौकोन असलेले अतिभव्य शब्दकोडे त्यांनी तयार केले आहे. अलीकडेच त्यांचे 100 शब्दकोड्यांचे शब्दकोडी हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
कांबळी यांनी सन 1995 पासून मराठी शब्दकोडी करून वृत्तपत्रांत देण्यास सुरूवात केली. प्रसन्न कांबळी हे मुळचे वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावचे. दापोली तालुक्यातील केळशी येथे त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्र कृषी उद्योग मर्यादित या शासनाच्या अंगीकृत उद्योगातून ते वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. शब्दकोडी तयार करणे, उकडीचे मोदक बनविणे, रांगोळी काढणे आणि मोफत विवाह मेळावे यामुळे ते लोकप्रिय आहेत.
उकडीचे मोदक करण्यात तरबेज असलेले कांबळी यांनी श्री गणेशाचे बेचाळीस लाख जप केले आहेत. गेल्या सव्वीस वर्षांची अविरत तपस्या, हे माझ्या यशाचे गमक आहे, असे म्हणून ‘चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती श्रीगणेश, श्रीदेव वेतोबा, कुलस्वामिनी म्हाळसाई माता, दिवंगत आई वडील यांच्या आशीर्वादाने आणि अर्धांगिनी मयुरी यांच्या सहकार्याने हे यश मी खेचून आणले, असे त्यांनी सांगितले. तसेच या शब्दकोड्यासाठी वैभव भाटकर (ठाणे), मुलगा ओंकार, मुलगी सुरभि, मकरंद पटवर्धन, मृणाल पटवर्धन यांचे सहकार्य लाभले व प्रसन्न आंबुलकर, शेखर भुते यांनी प्रोत्साहन दिल्याचे प्रसन्न कांबळी यांनी सांगितले.
यापूर्वी माझ्या शब्दकोड्यांची नोंद लिम्का बुकने घेतली आहे.त्यानंतर दोन इंडिया रेकॉर्ड बुक मध्ये जाण्याचा मान मिळाला आहे.लवकरच यापेक्षाही मोठे शब्दकोडे साकारून गिनीज बुक मध्येही रत्नागिरीचे नाव रोशन करेन.
प्रसन्न कांबळी, शब्दकोडेकार
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List