यवतमाळ जिल्ह्यातील पोफळीत प्रतिबंधित 15 लाखांच्या गुटखा पकडला; एकूण 21 लाखांचा मुद्देमाल जप्त
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील पोफळी येथे पोलिसांनी गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडून 15 लाखांच्या गुटख्यासह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थावर बंदी आहे. मात्र, छुप्या मार्गाने प्रतिबंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक होत असते. आशा छुप्या कारवाईवर पोलिसांकडून बारीक नजर ठेवली जाते. अशाच एका छुप्या कारवाईचा पोफळी पोलिसांनी भंडाफोड केला आहे.
राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा लगतच्या राज्यातील तेलंगणातून पुसदकडे जात असताना पोलिसांनी पथकाने पकडला आहे. यात गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडून 15 लाखांच्या गुटख्यासह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोबतच या कारवाईत बोलेरो चालकाला अटक करण्यात आली आहे. मात्र एक आरोपी पसार झाला आहे. पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाहन चालक शेख अयाज शेख वहाब याला अटक करण्यात आली. पोफळी पोलीस पथकाला पथकाला प्राप्त माहितीनुसार रात्री 1 वाजण्याच्या सुमार उमरखेड पुसद रोडवर गंगणमाळ फाटयावर नांदेड येथून काही अज्ञात व्यक्ती पुसदकडे जात आहेत. त्यांच्या बोलेरो पिकअप वाहनात अवैध गुटखा आणि इतर प्रतिबंधित मालाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या वाहनाची अडवणूक करून त्याबाबत चौकशी केली. याचौकशी दरम्यान त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. यावरून पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि पोलिसांनी वाहनाची झडती घेतली. त्यात सुमारे 15 लाखांचा प्रतिबंधित गुटखा गाडीत लपवून ठेवल्याचे आढळून आले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा माल कोठून आणला व त्याचा मुळ मालक कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणामुळे लगतच्या राज्यातून होणाऱ्या अवैध गुटखा आणि इतर प्रतिबंधित अमली पदार्थांची तस्करी प्रकरण समोर आले आहे. किरकोळ पैशांच्या मोबदल्यात या अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करण्यात येत असते. मात्र या कारवाईमागे असलेले मोठे मासे शोधून काढणे हे आव्हान आता पोलीसांपुढे असल्याचे बोलले जात आहे.
ही कारवाई पवन बनसोड (पोलीस अधिक्षक यवतमाळ), पियुष जगताप (अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ), हनुमंत गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड), आधारसिंग सोनोने (पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ), सहा. पोलीस निरीक्षक पंकज व्ही दाभाडे ठाणेदार पोफाळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष झिमटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश बोंबले, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कांबळे, महीला पोलीस कॉन्स्टेबल निलम श्रीवास यांनी पार पाडली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List