जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही परिणाम दिसेल; रोहित पवार यांचा दावा
लोकसभा निवडणुकीत जनतेचा राज्य आणि केंद्र सरकारविरोधातील रोष दिसून आला. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही जनता योग्य तो निर्णय घेईल आणि त्यांचा रोष व्यक्त करेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. गेली दोन-अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला तसाच विधानसभेतही दिसणार आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आमदार रोहित पवार यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे पत्र शेअर करत त्यांनी सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. तसेच, याबाबत येत्या दोन दिवसांत मोठा खुलासा करणार, असेही रोहित पवार यांनी सांगितले. याबाबत केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, गेली दोन अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला.. तसाच विधानसभेतही दिसणार आहे.
आता निवडणुका जवळ येत असल्याने आम्ही काहीतरी केले, हे कसे दाखवावे या विवंचनेतून सत्ताधारी आमदारांना येणाऱ्या अधिवेशनात भरीव निधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण निधी देणार कुठून? हा प्रश्न अर्थमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांची फाईल ज्यांच्या सहिने पास होते त्या गृहमंत्र्यांना पडतो की नाही?
सरकारच्या याच उधळपट्टीमुळे राज्याच्या तिजोरीत निधीचा खडखडाट झाला असून यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाची 20 हजार कोटींची बिले अद्यापही थकीत आहेत. सरकार बिले देत नसल्याने तर राज्यातली बहुतांश कामेही थांबली आहे.
अशी स्थिती असताना आणखी कमिशन खाण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना, आमदारांना खूष करण्यासाठी नवीन कामांना निधी देण्याचा घाट घातला जात आहे का? यासाठी पुन्हा नव्याने हजारो कोटींची कर्जे काढली जातील, हे सरकार पुन्हा सत्तेत तर येणार नाही मात्र जाता जाता राज्याच्या तिजोरीची पूर्णपणे वाट लावून जाईल, हे मात्र नक्की आहे. यासंदर्भात राज्याची तिजोरी कुरतडणारा राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा येत्या दोन दिवसात करणार आहे!
गेली दोन अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला.. तसाच विधानसभेतही दिसणार आहे.
आता निवडणुका जवळ येत असल्याने आम्ही काहीतरी केले, हे कसे दाखवावे या… pic.twitter.com/S49WQVw9h4
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 24, 2024
राज्याची तिजोरी कुरतडणारा. राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा येत्या दोन दिवसात करणार असल्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात रोहित पवार नेमका कोणता खुलासा करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List