तुमचीही अघोषित आणीबाणीच, आणखी किती दिवस राज्य करायचंय? मल्लिकार्जुन खरगेंचं मोदींना प्रत्त्युत्तर, केला तिखट सवाल
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणीबाणीच्या टीकेवरून जोरदार प्रत्युत्तर दिलं. वारंवार आणीबाणीबद्दल बोलून त्यांना आणखी किती काळ राज्य करायचं आहे? असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
‘त्यांनी हे 100 वेळा म्हटलं आहे. पण तुम्ही (नरेंद्र मोदी) आणीबाणी जाहीर न करता हे करत आहात. यावर बोलून तुम्हाला किती दिवस राज्य करायचं आहे?’ असं मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारलं.
संसद सदस्य म्हणून शपथ घेण्यापूर्वी संसदेच्या नवीन इमारतीबाहेर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आणीबाणीवरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
25 जून 1975 रोजी देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या 21 महिन्यांच्या कालावधीचे स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘देशाचे तुरुंगात रूपांतर झाले होते, तो काळ हिंदुस्थानची नवीन पिढी कधीही विसरणार नाही, ते पुढे म्हणाले. आम्ही एक चैतन्यशील लोकशाही निर्माण करू जेणेकरून हिंदुस्थानात पुन्हा असं कृत्य करण्याचं कोणी धाडस करणार नाही’.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List