बलात्काऱ्याची मुदतपूर्व सुटका, हायकोर्टाने मंजूर केली याचिका
मुदतपूर्व सुटकेची बलात्कारी आरोपीची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली. या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. गेली 22 वर्षे आरोपी कारागृहात आहे. त्याने शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे असे ग्राह्य धरून त्याची सुटका करावी, असे आदेश न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना दिले.
सतीश चौरासिया असे या आरोपीचे नाव आहे. मुदतपूर्व सुटकेसाठी चौरसियाने याचिका केली होती. न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने चौरासियाची याचिका मंजूर केली. अन्य कोणत्या प्रकरणात कोठडीची आवश्यकता नसल्यास चौरासियाची सुटका करावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.
काय आहे प्रकरण…
स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याचा चौरासियावर आरोप होता. यासाठी दोषी धरत वसई सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. 19 वर्षे 10 महिने 28 दिवस मी कारागृहात आहे. मुदतपूर्व सुटकेचा लाभ मला द्यावा, अशी मागणी त्याने राज्य शासनाकडे केली. जन्मठेपेची शिक्षा म्हणजे आरोपीने आयुष्यभर कारागृहात राहावे, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवला आहे. राज्य शासनाने चौरासियाच्या अर्जावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत नोंदवत तुरुंग महानिरीक्षकांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला. त्याची नोंद करून घेत शासनाने 2020 मध्ये चौरसियाचा अर्ज मान्य केला नाही. त्याविरोधात चौरासियाने याचिका केली होती. दरम्यान, चौरासियाने स्वतःच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगू नको, असे त्याने मुलीला धमकावले. त्याची मुदतपूर्व सुटका झाल्यास तो पुन्हा तेच कृत्य करू शकतो, असा युक्तिवाद राज्य शासनाने केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List