संसदेत ‘इंडिया’चा आवाज घुमणार ! नीट परीक्षा गोंधळावरून विरोधक भाजप सरकारला घेरणार; 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन
चारसो पारची घोषणा देऊन अडीचशेही पार करता न आल्याने चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या कुबडय़ांवर केंद्रात उभ्या राहिलेल्या नरेंद्र मोदी सरकारला पहिल्याच अधिवेशनात अग्निदिव्याला सामोरे जावे लागणार आहे. 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाल्याने ‘इंडिया’ आघाडीचा आवाज संसदेत घुमणार आहे. लोकसभा अध्यक्षांची निवड हा अधिवेशनाचा प्रमुख अजेंडा असला तरी नीट परीक्षेतील गोंधळ आणि शेअर बाजार घोटाळय़ावरून विरोधकांकडून सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे.
18 व्या लोकसभेवर निवडून आलेले दोन खासदार सध्या गंभीर गुह्याखाली तुरुंगात आहेत. पंजाबच्या खडूर साहिब मतदारसंघातून जिंकून आलेले अमृतपालसिंग यांच्यावर खलिस्तान समर्थक असल्याचा आरोप असून खलिस्तानी चळवळीशी संबंधित असल्याच्या आरोपातून त्यांना अटक करण्यात आली. ते आसामच्या दिब्रूगढच्या तुरुंगात जेरबंद आहेत, तर जम्मू-कश्मीरच्या बारामुल्लामधून अपक्ष निवडून आलेले राशिद इंजिनीअर यांच्यावर दहशतवादी कारवायांना पैसे पुरविल्याचा आरोप असून ते दिल्लीच्या तिहार जेलची हवा खात आहेत. या दोन गुन्हेगार खासदारांचा शपथविधी नियोजित वेळापत्रकात होतो की अध्यक्षांच्या परवानगीने पॅरोल मिळाल्यानंतर त्यांचा शपथविधी होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
देशभरात नीट परीक्षांच्या पेपरफुटीने संतापाचे वातावरण आहे. या संतापाला विरोधी पक्ष या अधिवेशनात मोकळी वाट करून देतील व सरकारला जाब विचारतील. त्याचबरोबर लोकसभेचा निकाल लागल्यानंतर शेअर बाजारात झालेल्या उलथापालथीमागे मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्या मुद्दय़ावरूनही संसदेत गदारोळ होण्याची चिन्हे आहेत.
उपाध्यक्षही मिळणार
17 व्या लोकसभेत उपाध्यक्षच न नेमण्याचा पराक्रम मोदी सरकारने केला होता. मात्र 18 व्या लोकसभेत विरोधकांचे वाढलेले प्राबल्य लक्षात घेता उपाध्यक्षांचीही लवकरात लवकर निवड करावी लागणार आहे.
लोकसभा अध्यक्ष कोण?
भाजप बहुमतापासून दूर असल्याने यावेळी लोकसभेच्या अध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला आहे. ओम बिर्ला यांच्या नावाला पक्षातून विरोध आहे. चंद्राबाबूंनी सर्व मित्रपक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या अशी मागणी केली आहे. त्यातून भाजप चंद्राबाबू यांची मेहुणी डी. पुरंदेश्वरी यांचे नाव पुढे करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीने अध्यक्षपदाबाबत पत्ते उघडलेले नाहीत.
विरोधी पक्षनेता कोण?
कोणत्याच विरोधी पक्षाला दहा टक्केपेक्षा जास्त जागा जिंकता न आल्याने दहा वर्षे लोकसभा विरोधी पक्षनेत्याविना होती, मात्र या वेळी 99 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला हे पद मिळेल. राहुल गांधी यांना या जबाबदारीसाठी आग्रह धरला जात आहे. त्यांनी नकार दिल्यास मनीष तिवारी, गौरव गोगोई, कुमारी शैलजा ही नावे स्पर्धेत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List