नीट पेपरफुटीचे महाराष्ट्र कनेक्शन; लातूरमधून दोन शिक्षक एटीएसच्या ताब्यात
बिहारपाठोपाठ नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमधील दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. या दोन शिक्षकांपैकी एकजण लातूरमध्ये, तर दुसरा सोलापुरात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांची नांदेड एटीएसकडून कसून चौकशी सध्या सुरू आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी दर दिवशी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच नीट पीजी परीक्षादेखील आरोग्य मंत्रालयाने पुढे ढकलली आहे. एटीएसने ताब्यात घेतलेले शिक्षक संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण यांचा पेपरफुटी प्रकरणात सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले आणि गरज पडल्यास त्यांना पुन्हा बोलावण्यात येईल, असे एटीएसकडून त्यांना सांगण्यात आले आहे. लातूरमध्ये नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठय़ा संख्येने विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे परीक्षेतील गैरप्रकारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का, यादृष्टीने नांदेड एटीएसचा तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसने या दोघा शिक्षकांना ताब्यात घेतले.
लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवासी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत, तर लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूर येथे खासगी कोचिंग क्लासेस चालवत होते अशी माहिती आहे.
सीबीआयने दाखल केला गुन्हा
नीट-यूजीमधील अनियमिततेबाबत सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच राज्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींनाही सीबीआयकडून ताब्यात घेतले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 13 जणांना अटक करण्यात आली. नीट यूजीचा पेपर 30 ते 40 लाख रुपयांना विकण्यात आल्याची धक्कादायक माहितीही उघड झाली आहे.
संपूर्ण शिक्षण व्यवस्था भ्रष्ट लोकांच्या हातात
संपूर्ण शिक्षण व्यवस्था माफिया आणि भ्रष्ट लोकांच्या हातात गेल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी एक्सवरून केली आहे. तरुण भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात लढून आपला बहुमूल्य वेळ वाया घालवत आहेत आणि मोदीजी फक्त शो पाहत आहेत, अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी एनडीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
बिहारमध्ये सीबीआयच्या पथकावर हल्ला
यूजीसी नेट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात एका संशयिताच्या मोबाइल लोकेशननुसार सीबीआयचे पथक बिहारमधील नवादा येथे पोहोचले, परंतु तोतया असल्याचे समजून गावकऱ्यांनी या पथकावर हल्ला केला व त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. या प्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List