मुंबईत आज पावसाचा जोर; सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून एखादी पावसाची सर आणि अधूनमधून सूर्यनारायणाचे दर्शन, मध्येच ढगाळ वातावरण आणि असह्य उकाडा अशा लहरी वातावरणापासून मुंबईकरांची सुटका होणार आहे. उद्यापासून पुढचे 48 तास मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रत्नागिरी, रायगड आणि पुणे, सातारा कोल्हापूर येथील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही आनंदवार्ता ठरणार आहे.
महाराष्ट्र ते कर्नाटक आणि केरळचा उत्तरेकडील भाग येथे हवेच्या मध्यम दबावाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून जोरदार वारे वाहू लागले असून अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढेल असे स्कायमेटचे वैज्ञानिक महेश पलावत यांनी सांगितले मुंबईत पुढचे दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असून हवामान ढगाळ राहणार आहे तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 आणि 26 अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाडय़ात जोरदार पाऊस
मराठवाडय़ातील जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिह्यात आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. हिंगोली जिह्यात पावसाचा जोर अधिक होता. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा आणि चंद्रपूर जिह्यात हलका पाऊस पडला, तर यवतमाळ, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिह्यात मध्यम पाऊस पडला.
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचवेळी रत्नागिरी, रायगड तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर येथील घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिह्यासाठी प्रशासनाने आपत्ती निवारण दल आणि शीघ्र कृती दलाच्या तुकडय़ा तैनात केल्या आहेत. अतिमुसळधार पावसाचा अंदाज घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आपत्ती निवारण दलाचे जवान सज्ज आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List