पुण्यात पुन्हा बेदरकारपणाचा बळी; सत्ताधारी आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला कारखाली चिरडले

पुण्यात पुन्हा बेदरकारपणाचा बळी; सत्ताधारी आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला कारखाली चिरडले

सत्ताधारी अजित पवार गटाचे खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या पुतण्या मयूर याने बेदरकारपणे कार चालवून दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील कळंब परिसरात घडली. अपघातात 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी कारचालकावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर परिसरात बेदरकार अल्पवयीन कारचालकाने दिलेल्या धडकेत दोघा अभियंत्यांचा जीव गेल्याची घटना 19 मे रोजी घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तसाच अपघात घडल्याने खळबळ उडाली आहे.

जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते हा कारमधून (क्र. एमएच 14 केजे 7557) कळंब बाजूकडून मंचरच्या दिशेने वेगाने चालला होता. त्याच वेळी कळंब गावच्या हद्दीतील सहाने मळय़ात राहणारा ओम ऊर्फ बंटी सुनील भालेराव हा मोटारसायकलवरून कळंब गावाकडे चालला होता. एकलहरे गावच्या हद्दीत पिकअप गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात मोहितेच्या गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार ओम भालेराव अपघातात गंभीर जखमी झाला.

अपघात प्रकरणी मंचर पोलिसांनी आरोपी मयूर मोहिते याच्यावर कलम 304 (2), 337 आणि 338 यासह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मयूर गाडीत बसूनच राहिला

गंभीर अपघातानंतरदेखील कारचालक आरोपी मयूर मोहिते गाडीतून उतरण्यास तयार नव्हता. तो बाहेर येत नसल्याने स्थानिक तरुणांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. त्यावर गाडीचा दरवाजा उघडत नसल्याचे त्याने सांगितले. अखेर स्थानिक तरुणांनी दार उघडल्यानंतर तो बाहेर आला. या प्रकारामुळे स्थानिक तरुण संतापले होते.

जखमी ओम भालेराव याला उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातात ठार झालेला ओम एकुलता एक मुलगा होता. रविवारी सकाळी नऊ वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलीस घटनेची चौकशी करीत आहेत. झालेली गोष्ट ही 100 टक्के चुकीची आहे. मी मृत तरुणाच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असून, वातावरण शांत झालं की मी स्वतः त्यांची भेट घेणार आहे. मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही.

दिलीप मोहिते-पाटील, आमदार, खेड-आळंदी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;