नक्षलवाद्यांनी पोलिसांचा ट्रक आयईडी स्फोट घडवून उडवला; छत्तीसगडमध्ये 2 जवान शहीद
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा आढावा बैठकांचा सपाटा लावला असताना छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ले वाढले आहेत. सुकमा आणि विजापूर सीमेवर नक्षलवाद्यांनी आज आयईडी स्फोट घडवून पोलिसांचा ट्रक उडवून दिला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.
जगगुंडा भागात असलेल्या सिल्जर कॅम्पमधून 201 कोब्रा कॉर्प्सच्या सैनिकांची तुकडी ट्रक आणि बाइकने टेलगुडेमकडे निघाली असताना नक्षलवाद्यांनी वाटेत आयईडी स्फोटके पेरून ठेवली होती. सैनिकांनी भरलेला ट्रक दुपारी तीनच्या सुमारास या ठिकाणी आला असता मोठा स्फोट झाला. या स्फोटात ट्रकचालक जवान विष्णू आर आणि सहचालक जवान शैलेंद्र हे दोघे शहीद झाले, तर अनेक जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हे जवान शिधा घेऊन कॅम्पकडे जात होते असे सांगण्यात आले.
टेकलगुडम आणि त्यापलीकडील पूर्वेकडील भागात नक्षलवादी कमांडर हिडमा आणि देवा यांची दहशत आहे. काही महिन्यांपूर्वीच येथे सुरक्षा दलांची छावणी स्थापन करण्यात आली होती. महिनाभरापूर्वी विजापूर जिह्यातील पोलीस स्टेशन प्रभारींचे वाहन नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून उडवून दिले होते. फरसेगढ पोलीस ठाण्याचे प्रभारी आकाश मसिह हे आपल्या एका शिपायासोबत सरकारी कामासाठी विजापूरला निघाले होते. मात्र, या हल्ल्यात स्टेशन प्रभारी आणि जवान सुरक्षित राहिले. वाहनाच्या पुढील भागाचे थोडे नुकसान झाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List