विज्ञान – रंजन – ‘चालणारे’ झाड?
>> विनायक
एकदा ज्येष्ठ फ्रेंच खगोल वैज्ञानिक ज्यां क्लॉड पेकर यांच्याशी गप्पा चालल्या होत्या. बोलता बोलता त्यांनी आम्ही त्यांना दिलेल्या पुष्पगुच्छाकडे पाहत म्हटले, ‘आपण विश्वाचा शोध घ्यायलाच हवा, पण आता या फुलांवर बसणारा आणि उडणारा हा सूक्ष्म कीटक आपल्याला कितीसा ठावूक आहे? पृथ्वीवरच्याच अनेक गोष्टी अजूनही आपल्याला अगम्य आहेत. संशोधक त्यावरही काम करतायत. मात्र, आपले सभोवताल आपल्याला बरेच समजलेय या भ्रमात राहू नये. संशोधनाची अतृप्तताच पुढच्या संशोधनाचा मार्ग दाखवत असते.’
त्यांचे ते अनुभवाचे बोल खरे होते. आमच्या मुंबईतल्या राजावाडीत एकेकाळी भरपूर वनश्री आणि एक स्वच्छ पाण्याचा बारमाही ओढा होता. (पुढे त्याचं नाल्यात रूपांतर झालं.) शेकडो वर्षांपूर्वीची काही झाडे होते. वड, पिंपळ, चिंचांची रेलचेल होती. पावसाळय़ात विविध प्रकारचे प्रजातींचे गवत उगवत असे. त्यावर मोसमी कीटक (चतुर वगैरे) येत असत. फुलझाडे आणि फळझाडे मिळून सुमारे दीडशे प्रकारची वनसंपदा होती. बदलत्या काळाबरोबर अनेक गावे, शहरे उजाड झाल्यानं जगात जे घडते तसेच बऱ्याच प्रमाणात इथेही घडले. मात्र त्या काळात झाडामाडांची झालेली ‘ओळख’ आजही ताजी आहे.
हा काही ललित लेख नव्हे, पण कुतूहल वाढवणाऱ्या वनस्पतींमधली दोन-चार नावे सांगायची तर लाजाळूची (माथमोसा) स्पर्श होताच पाने मिटून घेणारी छोटीछोटी झुडपे, केवळ पावसाळय़ात उगवणारा तंतुमय पाने आणि लालचुटुक फुलांचा गणेशवेल आणि क्वचितच रात्री उमलणारे ब्रह्मकमळ यांची आठवण येते. आपले जीवन समृद्ध करण्यात या सगळय़ांचा वाटा असतो.
यापेक्षाही विस्मयकारी झाडे आणि महाकाय वनस्पती अमेरिका, आफ्रिका आणि आपल्याकडेही दक्षिण हिंदुस्थानात आढळतात. ज्या झाडांच्या खोडात अख्खे ‘घर’ वसवता येते किंवा त्याच्या खोडातून रस्ता आरपार गेला तरी ज्याला काही फरक पडत नाही त्या ‘बाओबाब’ प्रकारची मोजकी झाडे मुंबईही दिसतात. आता पाऊस जोर धरू लागेल तेव्हा आपल्याकडची मौसमी फुलझाडे आणि रानवनस्पती तरारून उगवतील. त्या निमित्ताने आठवण आली ती एक सजीव म्हणून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी चक्क ‘चालणाऱ्या’ सोक्रॅटी एक्झोऱ्हायझा नावाच्या झाडाची.
अशा कोणत्या तरी वनस्पतीचा ‘चालण्याचा’ एक व्हिडीओसुद्धा पाहिला. तो खरा नव्हे. कारण झाडे ‘सजग’ होऊन माणसासारखी पळत सुटली तर पृथ्वीवरच्या सर्वच चालत्या आणि उडत्या सजीव सृष्टीत हाहाकार माजेल. संतापलेले वडाचे झाड आपल्या शेकडो पारंब्या पिंजारून धावत सुटलेय ही कल्पना भयपटातच शोभण्यासारखी आहे. 1951 मध्ये जॉन विन्डॅम यांनी अशा आशयाची कथा लिहिली आणि त्यावर 1963 मध्ये ‘द डे ऑफ ट्रिफिड्स’ नावाचा चित्रपट आला. एक ‘फॅन्टॅसी फिल्म’ म्हणून जरूर बघा.
त्यात ‘आक्रमक’ झाडांचे ‘हॉरर’ दाखवले होते. तसे काही सॉक्रॅटी एक्झोऱ्हायसा ही झाडे चालत नाहीत. मात्र घनदाट जंगलात पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने जीवनावश्यक हरितद्रव्य (क्लोरोफिल) तयार करण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी त्याची ‘स्टील्ट रुट्स’ किंवा आधारमुळे प्रकाशाच्या दिशेने वाढू लागतात. अंधाऱ्या बाजूची मुळे निष्क्रिय होतात आणि झाड थोडे थोडे ‘सरकत’ जागा बदलून प्रकाशाच्या भागात जाते. अर्थातच याला अनेक वर्षे लागतात. जंगलात (अमेरिकेतील) दिसणारी ही झाडे पर्यटकांना कुतूहल म्हणून आकर्षित करतात, पण त्यांची ‘हालचाल’ न दिसल्याने ते निराश होऊ शकतात. अशाच प्रकारे आत्मविस्तार करीत चांगले चार-पाच एकर व्यापणारे आपल्या सर्वांच्या परिचयाचे झाड आहे ते वडाचे!
वडाच्या पारंब्या ही त्याची लटकती मुळेच असतात. (प्रॉप रुट्स) वडाचा विस्तार व्हावा यासाठी ही नैसर्गिक रचना असते. शेकडो वर्षे जगणाऱ्या अशा ‘अमर’ झाडांची सुरुवातीची मुळे वाढवतात, पण वडाला फुटलेल्या पारंब्या अनुकूल परिस्थितीत जागा मिळेल तिथे विस्तारतात. पिंपळ-वड यांची मुळे हवेतली आर्द्रता शोषूनही वाढतात. म्हणूनच पिंपळ तर खडकावर किंवा इमारतींवरही वाढताना दिसतो. आपण या गोष्टींचा विचार क्वचितच करतो. या सगळय़ाची बोटॅनिकल (वनस्पतीशास्त्रीय) माहिती कदाचित क्लिष्ट वाटेल, पण ज्यांना निसर्गाची ‘रहस्ये’ जाणाविशी वाटतात त्यांनी ती नेटवरून किंवा पुस्तके मिळवून वाचावी.
…तर ‘चालणारे’ मानले जाणारे सॉक्रॅटी एक्झोऱ्हायझा झाड 25 फुटांपर्यंत उंच वाढते. त्याचे खोड सुमारे 16 सेंटीमीटर असते. तेही उंच वाढते. दलदलीच्या प्रदेशात वाढणारे एक माडाच्या (पाम) प्रजातीचे झाड त्याला गरजेनुसार फुटणाऱ्या ‘स्टील्ट रुट्स’ किंवा आधारमुळांच्या सहाय्याने सरकते. अनेकदा अशा मुळांमुळे झाड उंच वाढून त्याला अधिक सूर्यप्रकाश मिळतो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हा संदेश झडापानांना ठावूक नसेल, पण तीच त्यांची जीवनपद्धती असते. साधे मेथीचे किंवा आळीवाचे दाणे एका ट्रेमध्ये पेरा आणि खिडकीजवळ ठेवा. त्याला पाने फुटली की त्यांची वाढ प्रकाशाच्या दिशेने होताना दिसेल. रहस्य उलगडलेल्या या विज्ञानातल्या ‘रंजक’ गोष्टी.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List