मुख्यमंत्री यांचा शिक्षण, शिक्षण धोरणाशी संबंध काय? संजय राऊत यांचा भीमटोला
नाशिक येथील शिक्षक मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी धडाकेबाज भाषण करत सत्ताधाऱ्यांना चांगलेच तडाखे लागावले. यावेळी त्यांनी बोगस मतदान, बाद होणारी मते याबाबतही मार्गदर्शन केले. तसेच शनिवारी मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले होते. ते त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. मात्र, मुख्यमंत्री आणि शिक्षण किंवा शैक्षणिक धोरण यांचा काही संबंध आहे काय, असा सवाल करत संजय राऊत यांनी जबरदस्त टोला लगावला.
शिक्षकांच्या समस्यांची ज्यांना जाणीव आहे, ज्यांना शिक्षकांच्या समस्या सोडवण्याची खरी तळमळ आहे. जो शिक्षकांचे प्रश्न सभागृहात उपस्थित करू शकतो, अशा व्यक्तीला निवडून देण्याची गरज आहे. शिवसेनेचे उमेदवार संदीप गुळवे यांना शिक्षकांच्या समस्यांची जाणीव असून ती सोडवण्याची तळमळ आहे. मुख्यमंत्री आले आणि आमच्या उमेदवाराला विजयी करा, असे म्हणाले. शिक्षक, शिक्षकांच्या समस्या, विद्यार्थी याबाबत त्यांना काहीही माहिती नाही. या मतदारसंघाशी काहीही संबंध नसताना प्रचारासाठी येतात. शिक्षकांना बाजारात उभे केल्याप्रमाणे त्यांचे भाव लावतात. हे चिंताजनक आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराला निवडून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
शिक्षकांचा भाव करणारी आणि त्यांना गुलाम करणारी वृत्ती ठेचण्याची गरज आहे. ज्या देशात शिक्षकांना मान्मान मिळत नाही, त्या देशाची प्रगती होत नाही. शेतकरी आणि शिक्षक हे सुसंस्कृत समाजाचा कणा आहे. त्यामुळे त्यांना मानसन्मान मिळालाच पाहिजे. गेल्या काही वर्षात सत्ताधाऱ्यांनी शिक्षकांना याचक केले आहे, ही परिस्थिती दुर्दैवी आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
शिक्षक मतदारसंघातील मते बाद कशी होतात. अनेकदा यात बोगस मतदान होते. त्या बोगस मतदानामुळे अनेकदा मते बाद होतात. त्यामुळे बोगत मतदान होणमार नाही आणि मते बाद होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच आपल्या नावावर बोगस शिक्षक मतदान करणार नाही, याची काळजी घ्या. तसेच योग्य उमेदवार निवडून द्या, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List