विजेचा शॉक लागून लाईनमनचा जागीच मृत्यू ; संतप्त गावकऱ्यांनी केला रस्ता रोको
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बेलोरा येथील नामदेव पांडुरंग मारकड हे रोहडा शिवारात विद्युत लाईनचे काम करण्यासाठी विजेच्या खांबावर चढले. त्याचवेळी अचानक विजेचा प्रवाह सुरु झाला. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वीज प्रवाह खंडित करण्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तरीही त्यांनी वीज प्रवाह सुरु केल्याने विजेचा शॉक लागून लाईनमन नामदेव पांडुरंग मारकड यांचा जागीच मृत्यू झाला.
नामदेव पांडुरंग मारकड 14 ते 15 वर्षे पासून महावितरण कंपनीच्या कर्मचारी, लाईनमनसोबत काम करत होते. घटनेच्या दिवशी लाइनचे काम करणार असल्याची पूर्वसूचना महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. पूर्वसूचना दिल्यानंतरही विजेचा उच्च दाबेचा प्रवाह अचानक सुरु झाल्याने नामदेव यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. मृत्यु झाल्यानंतर मृतदेह एक तास विजेच्या खांबावरच होता. तरीही महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी आले नाहीत. गावातील लोकांनी संताप व्यक्त करत वाशिम पुसद महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. जोपर्यंत महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी येऊन नामदेव मारकड यांच्या कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई देणार नाहीत, तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवणार नसल्याची भूमिका मृताचे भाऊ पवन मारकड यांनी घेतली.
खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक देविदास पाटील यांनी ग्रामस्थांची आणि मृताच्या नातेवाईकांची समजूत काढली आणि मृतदेह उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्याची विनंती केली. मात्र, दोषीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह हटविला जाणार नाही, असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले. नामदेव यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. खाजगी वायरमन हे विजेच्या खांबावर कसे चढले. त्यांना या संदर्भात कोणी परवानगी दिली. काम करीत असताना कोणतेही विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी उपस्थित का नव्हते, असे सवाल गावकऱ्यांनी केले आहेत.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार खेडे विभागात अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो . त्याचा त्रास गावकऱ्यांना होतो . तासनतास लाईनची वाट बघत बसावी लागते . विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी एकतर वेळेवर येत नाहीत ,नेहमीच ते टाळाटाळ करतात अथवा एखाद्या खाजगी वायरमनला हाताशी धरून बसल्याजागी कामे करून घेतात . हा त्यांचा नेहमीचा शिरस्ता आहे . गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नामदेव यांनी गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याची कल्पना संबंधित कर्मचाऱ्याला दिली होती . असे असूनही विद्युत पुरवठा कसा सुरु झाला हा प्रश्न अनुत्तरित आहे. या हलगर्जीपणामुळे नामदेव यांना जीव गमवावा लागला. संबंधित कर्मचारी सध्या फरार असल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत गावाकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List