वाळूमाफियांनी कोकणातले समुद्रकिनारे पोखरले; वाळूचोरी रोखण्यासाठी सीसीटिव्ही लावण्याची मागणी
रत्नागिरीतील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जात आहे. पांढरा समुद्र, मिऱ्या आणि काळबादेवी समुद्रकिनाऱ्यावर वाळूमाफिया राजरोस वाळूचोरी करत आहेत. मात्र, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. वाळूमाफियांनी कोकणातले समुद्रकिनारे पोखरले असून हे समुद्रकिनारे पावसाळ्यात धोकादायक ठरू शकतात. पांढरा समुद्र, मिऱ्या आणि काळबादेवी येथील वाळू चोरीच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
वाळूमाफियांकडून सुरू असलेली वाळूचोरी कोकण समुद्राकिनाऱ्याजवळील मोठा प्रश्न बनला आहे. वाळूचोरीतून अनेकांनी बेकायदा रोजगार शोधला असला तरी समुद्रकिनाऱ्यावरील हे बेसुमार वाळू उत्खनन पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. वाळूचोरीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून महसूल प्रशासन वाळू चोरीवर कोणतीही कारवाई करत नाही. तसेच रस्त्यावरून होणारी वाळूच्या चोरट्या वाहतूककडेही दुर्लक्ष करण्यात येते. रत्नागिरीतील पांढरा समुद्र, मिऱ्या आणि काळबादेवी परिसरातील वाळू उत्खनन कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमी करत आहेत. भंडारापुळे येथे वाळू चोरीची तक्रार एका माजी आमदारांनी केल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली होती.
रत्नागिरी शहरात पोलिसांनी नाक्यानाक्यात सीसीटिव्ही लावले आहेत. पोलीस यंत्रणेने एक पाऊल पुढे टाकून वाळू चोरी होत असलेल्या पांढरा समुद्र, मिऱ्या आणि काळबादेवी परिसरात सीसीटिव्ही लावावेत अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List