भाजपमधील अंतर्गत वाद शमेना! नांदेडमध्ये चिंतन बैठकीच्या निमंत्रणावरून वाद उफाळला
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी चिंतन बैठकीचे आयोजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत केले होते. मात्र, बैठक सुरु होण्यापूर्वीच केवळ बारा-बारा कार्यकर्त्यांनाच बोलविल्याने संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी निमंत्रणे देणार्या मंडळींशी हुज्जत घालून राडा केला. हा गोंधळ जवळपास पंधरा मिनिटे सुरु होता. वरिष्ठांनी मध्यस्ती केल्यानंतर गोंधळ कमी झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत वादाची चर्चा होत आहे.
माजीमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकार्यांची शनिवारी आढावा बैठक झाली. त्यानंतर रविवारी पक्षाचे निरीक्षक राधाकृष्ण विखे पाटील यांचे दुपारी 12.30 वाजता नांदेडला आगमन झाले. त्यांचे स्वागत झाल्यानंतर आमदार व माजी खासदारांची त्यांनी आपल्या विश्रामगृहातील कक्षात बैठकीबाबत चर्चा केली. मतदारसंघनिहाय बैठका बोलाविण्यात आल्याने तसेच सुरुवातीला सर्व कार्यकर्त्यांची व पदाधिकार्यांची संयुक्त बैठक असल्याने विश्रामगृहातील सभागृहात अनेकजण आले होते. मात्र यावेळी संयोजकाकडून सूचना देताना प्रत्येक मतदारसंघातील केवळ बारा पदाधिकार्यांना निमंत्रित करण्यात आले आहे, त्यांनीच विधानसभा निहाय बैठकांना बसावे, उर्वरित विधानसभेच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या वेळेनुसार बैठकीला यावे, अशा सूचना करण्यात आल्या.
विखे पाटील यांची बैठक सुरु होण्याआधी निमंत्रणावरुन वाद सुरु झाला. बिलोली, देगलूर व नायगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यांनी पक्षासाठी काम केले. फक्त मिरविण्यासाठी काही पदाधिकार्यांनी पुढे पुढे केले. त्यामुळे सर्व पदाधिकार्यांना बैठकीत बसू द्या, या बारा जणांनी निवड कुणी केली, असा सवाल करत पक्षाचे ग्रामीण भागाचे पदाधिकारी मनोज जाधव व संजय पाटील घोगरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शितल खांडील आणि महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांना त्यांनी जाब विचारुन सर्व प्रमुख पदाधिकार्यांना बैठकीत बसू द्या, आम्ही स्वतःच्या पैशाने पक्षाचा प्रचार केला, फक्त निमंत्रतांना प्रवेश कसा काय असा सवाल यावेळी केला. त्यामुळे मनोज जाधव, शितल खांडील, संजय पाटील घोगरे आणि दिलीप कंदकुर्ते यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. त्यांच्यातील वाद वाढत गेला. सुमारे 15 मिनिटे हा गोंधळ सुरु होता. आम्हाला आमचे म्हणणे मांडू द्या, अशी भूमिका प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. गोंधळ सुरु असतानाच काही वरिष्ठ पदाधिकार्यांनी त्यात मध्यस्थी केली. त्यानंतर गोंधळ कमी झाला.
हॉटेल ताज पाटीलमध्ये नुकत्याच झालेल्या नांदेड दक्षिण व उत्तरच्या बैठकीत विधानसभा संघटक बालाजी पुयड पुणेगावकर व महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्यात प्रचंड वादावादी झाली होती. त्यानंतर पुन्हा रविवारी असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे भाजपतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून राजकीय वर्तुळात त्याची चर्चा आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List