वाळू माफियांची मुजोरी वाढली; कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यांच्या वाहनाला ट्रॅक्टरने दिली धडक
राज्यात वाळू माफियांची मुजोरी वाढत आहे. अनेक ठिकाणी वाळू माफियांकडून कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याच्या घटना होत आहे. अशीच एक घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. राहुरी तालूक्यातील आरडगाव येथे वाळू चोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठी यांच्या चारचाकी वाहनाला ट्रॅक्टरने धडक दिली. त्यानंतर आरोपी ट्रॅक्टर घेऊन पसार झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
राहुरी येथिल तहसिल विभागात बाबासाहेब रामजी पंडीत (वय 47) हे राहुरी येथे कामगार तलाठी म्हणून काम पाहतात. बुधवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार नामदेव पाटील यांच्या आदेशावरून बाबासाहेब पंडित व कोतवाल योगेश पुंजाहरी झुगे हे चारचाकी वाहनातून तालूक्यातील आरडगाव येथे चोरटी वाळू वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली आरडगाव रोडने आल्याचे दिसले. तेव्हा तलाठी बाबासाहेब पंडित यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रॅक्टर थांबवला नाही. तेव्हा तलाठी बाबासाहेब पंडित यांनी चारचाकी वाहनातून त्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला. तेव्हा ट्रॅक्टर चालकाने तलाठी बाबासाहेब पंडित यांच्या चारचाकी वाहनाला धडक दिली. त्यांच्या वाहनाला धडक दिल्यानंतर तो ट्रॅक्टरसह पसार झाला.
तलाठी बाबासाहेब रामजी पंडीत यांच्या तक्रारीवरून आरोपी विक्रम पार्वतीशंकर पेरणे (रा. आरडगांव, ता. राहुरी) याच्यावर वाळू चोरी व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List