गुजरात शिक्षण मंडळ म्हणते! बौद्ध धर्मात दोन स्तर, वरिष्ठ स्तरावर ब्राह्मण
एनसीईआरटीच्या पुस्तकांमधील अयोध्या आणि बाबरी मशिदीसंदर्भातील उल्लेख बदलण्यात आल्यानंतर आता गुजरात शिक्षण मंडळाच्या पुस्तकातील एका उल्लेखावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. बौद्ध विचारसरणीत हीनयान, महायान आणि वज्रयान अशा तीन प्रमुख शाखा असून बौद्ध दोन स्तरदेखील आहेत. वरिष्ठ स्तरातील बौद्धांमध्ये ब्राम्हण, क्षत्रिय आणि काही उच्चभ्रूंचा समावेश आहे तर कनिष्ठ स्तरामध्ये बौद्ध धर्मात धर्मांतरित झालेल्या आदिवासी आणि मागास वर्गातील लोकांचा समावेश असल्याचे पुस्तकात म्हटले आहे. यासंदर्भात गुजरात लोकसेवा आयोग आणि गुजरात बुद्धिस्ट ऍकेडमी या दोन यंत्रणांकडून जीएसबीएसटी अर्थात गुजरात शालेय शिक्षण पुस्तक अभ्यास विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. यावर चुकांची सुधारणा करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
गुजरात बोर्डाच्या 12 वीच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात बौद्ध धर्माविषयी चुकीचे उल्लेख करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या उल्लेखांमुळे बौद्ध धरमाविषयी वेगळी प्रतिमा निर्माण होत असल्याचे नमुद करण्यात आले असून हा प्रकार वाईट हेतूने करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
चुका सुधारण्याचे आश्वासन
पुस्तकातील चुका सुधारण्यात येईल, तसेच हा प्रकार चुकून झाला असल्याचे स्पष्टीकरण जीएसबीएसटीचे संचालक व्ही. आर. गोसाई यांनी दिले आहे. त्याचबरोबर यासंदर्भातील योग्य माहिती देण्याची विनंतीही त्यांनी केली असून ती माहिती सर्व शाळांना पाठवली जाईल. त्यानुसारच परिक्षेत प्रश्न विचारले जातील. पुढच्या वेळी जेव्हा पुस्तक छापले जाईल, तेव्हा हे बदल पुस्तकात केले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुस्तकात नेमका काय उल्लेख
बारावीच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात इंडियन कल्चर अँड कम्युनिटी या धडय़ात बौद्ध धर्मासह हिंदुस्थानातील एकूण आठ धार्मिक समूहांवर माहिती देण्यात आली आहे. शिखांप्रमाणेच हिंदुस्थानातील बौद्ध धर्मियांची संख्याही कमी आहे. बहुतांश बौद्ध धर्मीय महाराष्ट्रात राहतात. सम्राट अशोकाच्या काळात हिंदुस्थानात बौद्ध विचारसरणीचा मोठया प्रमाणावर प्रसार झाला. बौद्ध धर्मासाठी सारनाथ, सांची आणि बोधीगया ही महत्वाची ठिकाणे मानली जातात. त्यांच्या धर्मगुरुंना लामा म्हटले जाते. त्यांच्या धार्मिक स्थळांना बौद्ध मंदिर म्हटले जाते. तिथे इच्छा चक्र असतात. त्रिपिटिका हा त्यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. त्यांचा कर्म व पुनर्जन्म यावर विश्वास आहे, असा उल्लेख पुस्तकात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List