सालुमरदा थिमाक्का! एक अशीही ‘वट माता’

सालुमरदा थिमाक्का! एक अशीही ‘वट माता’

वृक्षवेली आणि पशुपक्ष्यांनाही आपल्या संस्कृतीत पूज्य स्थान आहे. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आज वटपौर्णिमा. कर्नाटकातील एक अशीही माता आहे की जिने स्वतःच्या पोटच्या अपत्यांप्रमाणे 385 वटवृक्षांचे संगोपन केले आणि त्यामुळेच ती ‘वट माता’म्हणून ओळखली जाते. या त्यांच्या अनोख्या कामाची पावती म्हणून या मातेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

वट पौर्णिमेला वडाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. महाभारतामधील जी काही उपाख्याने आहेत, त्यामध्ये सावित्रीचेही एक उपाख्यान आहे व त्याच्याशी निगडित ही परंपरा आहे. सावित्रीच्या कथेत देशातील स्त्रीच्या तेजस्वीतेचे देदिप्यमान दर्शन घडते. सावित्रीने ‘जन्मोजन्मी हाच पती मिळावा’ म्हणून प्रयत्न केले नाहीत, तर आपल्या बुद्धीचातुर्य व तपस्येच्या बळाने पतीचे आयुष्य वाढवण्याचे यशस्वी प्रयत्न केले, तसेच माहेर व सासरच्या कुळाचा उद्धारही केला. एका वडाच्या झाडाखाली तिने हे सर्व घडवून आणले, असे मानले जाते व त्यामुळे वटवृक्षाची पूजा केली जात असते.

वट हे सदापर्णी डेरेदार वृक्ष आहे. याचे वैज्ञानिक महत्व सुद्धा आहे. झाडाची पाने एका तासात 5 मिलीलीटर ऑक्सिजन देतात. हे झाड दिवसातील 20 तासांपेक्षा जास्त वेळ ऑक्सिजन पुरवते. इतर झाडांपेक्षा हा वृक्ष ६०% जास्त प्राणवायू सोडतो. म्हणूनच आधुनिक भाषेत याला “व्हेंटिलेटर” म्हटले तरी चालेल. शिवाय आयुर्वेदात याचे अनन्य साधारण महत्व विशद केले आहे. दुखापत, लचक, सूज यावर पानातून बाहेर पडणाऱ्या दुधाची मालिश दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास आराम मिळतो. उघडी दुखापत झाल्यास वटवृक्षाच्या दुधात हळद मिसळून जखमेवर बांधल्यास जखम लवकर बरी होते. एकंदरीतच पर्यावरणाचे समतोल राखण्याची महत्वाची जबाबदारी हा वृक्ष पार पाडतो.

वयाचे शतक पार केलेल्या सालुमरदा थिमाक्का या वृद्ध मातेला एकेकाळी अपत्यहीन असल्याने लोकांचे टोमणे सहन करावे लागत होते. हुलिकल या गावातील या दाम्पत्याने झाडांनाच आपले अपत्य मानले व वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करण्यामध्ये स्वतःला झोकून दिले. त्यांचे पतीचे नाव चिकय्या यांनी त्यांना मोलाची साथ दिली. त्यांच्या गावाजवळ वडाची अनेक झाडे होती. तेथील वडाची रोपे आणून ती महामार्गाच्या बाजूला हुलिकल ते कुडुर यादरम्यान लावण्यास त्यांनी प्रारंभ केला. सुमारे पाच किलोमीटरच्या जागेत महामार्गालगत त्यांनी तब्बल 385 वडाची झाडे लावली व वाढवली. पहिल्या वर्षी त्यांनी दहा झाडे लावली, दुसर्‍या वर्षी पंधरा आणि तिसर्‍या वर्षी वीस झाडे लावली. अशा प्रकारे त्यांनी झाडे लावणे सुरुच ठेवले. या झाडांना पाणी घालण्यासाठी ते चार-पाच किलोमीटर पाणी वाहून नेत असत. जनावरांपासून या झाडांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्याभोवती ते काटेरी कुंपणही करीत. पोटच्या पोराचा सांभाळ केल्याप्रमाणे त्यांनी ही झाडे वाढवली. पतीच्या निधनानंतरही थिमाक्कांनी आपला काम सुरू ठेवले आणि त्यांची कीर्तीही सर्वदूर पसरली. कालौघात कर्नाटक सरकारने या झाडांची जबाबदारी स्वीकारली. 2019 मध्ये कर्नाटकस्थित बागेपल्ली-हालागुरू रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ही झाडे कापली जाण्याचा धोका निर्माण झाला होता. थिमाक्कांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विनंती करून हा वृक्षतोडीचा धोका टाळला. त्यामुळे 70 वर्षे जुनी असलेले हे वृक्ष बचावले. थिमाक्कांनी या वृक्षांबरोबरच अन्य आठ हजार झाडेही लावून ती वाढवली आहेत. एका अपत्यहीन स्त्रीचा हा वंश आता वाढतच चालला आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. अन्यही अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘सालुमार्दा’ या कानडी शब्दाचा अर्थ होतो एका रांगेत लावलेली झाडे. त्यामुळे या आजीबाईंना ‘सालुमार्दा थिमक्का’ असेच नाव मिळाले. ‘बीबीसी’ ने थिमक्का यांचा समावेश जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये केला होता. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटकने त्यांना 2020 मध्ये मानद डॉक्टरेट बहाल केली. अमेरिकेतील एका पर्यावरणवादी संस्थेनेही त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली होती. एक अशिक्षित आणि एके काळी लोकांकडून हेटाळणी सहन केलेली ही माऊली आता जगविख्यात पर्यावरणवादी स्त्री बनलेली आहे. वटपौर्णिमेनिमित्त या ‘वट मातेस’ विनम्र अभिवादन.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;